● पिके सडली, शेत जमिन खरडली
वणी: खरीप हंगामाच्या सुरवातीला समाधानकारक पर्जन्यमान होईल असे भाकीत हवामान खात्याने केले होते. त्यामुळे बळीराजा सुखावला होता मात्र निसर्गाला हे मान्य नव्हतं. पंधरा दिवस झालेत पावसाचा तडाखा सुरू आहे. पिके सडली, शेत जमिन खरडली, शेताला तलावाचे स्वरूप आल्याने पन्नास टक्के शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
वणी तालुक्यात 61 हजार 526 हेक्टर शेतजमीन पेरणी योग्य आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी 48 हजार 632 हेक्टर शेतजमिनीवर पिकांची लागवड केली आहे. यात 40 हजार हेक्टर शेतजमिनीवर कपासी, 7 हजार 500 हेक्टर शेतजमिनीवर सोयाबीन तसेच उर्वरीत शेतजमिनीवर तुर, ज्वारी, भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली होती.
तालुक्यात सतत बरसत असलेल्या पावसाने पूर्णतः दाणादाण उडाली आहे. नदी, नाले तुडूंब भरल्याने या परीसरात असलेल्या शेतजमिनी मोठया प्रमाणात संकटात सापडल्या आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. शेतजमीन खरडुन गेल्याने भविष्याची चिंता सतावत आहे. दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतकरी आर्थीक विवंचनेत सापडला आहे.
तालुक्यातील तब्बल 28 हजार 760 हेक्टर शेतजमीन संततधार पावसामुळे बाधित झाली आहे. यामुळे दुबार पेरणीचे ग्रहण घोंगावत आहे. तालुक्यातील 9 मंडळापैकी प्रत्येक मंडळातील 35 ते 40 टक्के शेती बाधित झाली आहे. यामुळे शेतजमिनीच्या पंचनाम्याचे आदेश कधी धडकणार असा सवाल शेतकरी करीत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासुन शेती या व्यवसायीशीच नाळ जुळली आहे. याशिवाय त्यांच्याकडे उपजिवीकेसाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही. अशात आस्मानी संकटाने शेतकऱ्यांना बेजार करून सोडल आहे. अति पावसाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या उंबरठयावर आणले आहे.
वणी: बातमीदार
ही बातमी सुध्दा वाचा…
https://rokhthok.com/2022/07/18/16872