● मारेगाव 11 तर झरी जामनी 8 ग्रामपंचायती
वणी: ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून 18 सप्टेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. वणी विधानसभा मतदारसंघातील मारेगाव 11 तर झरी जामनी तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
राज्यात पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर ला मतदान तर 19 सप्टेंबर ला मतमोजणी होणार आहे.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट ला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट ला नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर ला दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर ला होणार आहे. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय असतील.
वणी: बातमीदार