● 200 कोटी रुपये आणू आ. बोदकुरवार यांची ग्वाही
वणी: विधानसभा मतदार संघाचा विकास हेच स्वप्न उराशी बाळगून आ. संजीवरेड्डी बोदकुरवार वाटचाल करताहेत. मात्र मध्यंतरी च्या काळात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि भाजपप्रणीत मतदारसंघात विकासाची गती मंदावली होती. अवघ्या काही दिवसांपूर्वी पुन्हा युतीची सत्ता स्थापन झाली आणि पहिल्याच अधिवेशनात विकास कामासाठी दणदणीत 53 कोटींचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे.
विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विभागनिहाय निधीची उपलब्धता करून देण्यात आली. महत्वपूर्ण असलेल्या बहुतांश खात्याला घसघशीत निधी देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागला प्राप्त निधीतून वणी मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्य देत विकास निधी देण्यात आला आहे.
वणी तालुक्यातील वेळाबाई फाटा ते कुरई, ढाकोरी बोरी रस्ता, मुकुटबन-पुरड- वेळाबाई -आबई फाटा रस्ता, उमरी मेढोली, चारगाव ते पेटूर या रास्त्यांच्या दुरुस्तीसाठी 30 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
मारेगाव तालुक्यातील खैरी कोसारा रस्ता, कोसारा खडकी- आडेगाव रस्ता, खैरी- करणवाडी रस्ता, मार्डी – चोपन -चनोडा -वनोजा -गौराळा रस्ता, करणवाडी नवरगाव गोधणी बोर्डा या रस्त्यासाठी 23 कोटी रुपये मंजुर झाले आहे. मतदारसंघातील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. नव्याने वहन क्षमतेचा विचार करून रस्त्याची निर्मिती करावी लागणार असून अवघ्या काही दिवसातच कामे सुरू होतील.
मागील युती शासनाच्या काळात वणी शहराचा कायापालट झाला आहे. 50 वर्षात जितकी कामे झाली नाही तेवढी कामे मागील 5 वर्षात झाली असे स्पष्ट केले. विधानसभेतील रस्त्यांसाठी करोडो रुपयांचा निधी प्राप्त करून दिला आहे. पुढील काही महिन्यातच मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी खेचून आणू असा विश्वास आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केला.
वणी: बातमीदार