Home Breaking News आज पुन्हा धरणातून पाण्याचा विसर्ग, वर्धा नदी ओलांडणार का धोक्याची पातळी…!

आज पुन्हा धरणातून पाण्याचा विसर्ग, वर्धा नदी ओलांडणार का धोक्याची पातळी…!

1320

प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

तिसऱ्यांदा पाटाळा पूल बंद , वाहतूक ठप्प

वणी | वणी-वरोरा मार्गावरील वर्धा नदीवर असलेला पाटाळा पूल या वर्षी तिसऱ्यांदा बंद झाला आहे. यामुळे चंद्रपूर तसेच नागपूरला जाणाऱ्या किंवा वणीला येत असलेल्या प्रवाश्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. तर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यावर्षी पावसाने चांगलाच हाहाकार माजवला आहे, आतापर्यंत वर्धा नदीवरील पाटाळा येथील पूल तीन वेळा बंद पडला आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारा तसेच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असलेला पूल बंद पडल्याने नागपूर, चंद्रपूर ला जाणाऱ्यांची गैरसोय होत असून काल पासून वाहतूक ठप्प झाली आहे.

परिसरातील धरणे पूर्णतः भरली आहे. यामुळे वेळोवेळी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून परिसरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नदी, नाले दुथडीभरून वाहताहेत. तालुक्यातून वर्धा, पैनगंगा ह्या दोन मोठ्या तर विदर्भा व निर्गुडा मध्यम स्वरूपाच्या अशा चार प्रमुख नद्या वाहताहेत.

यावर्षी वर्धा नदी चांगलीच कोपली आहे, यापूर्वी आलेल्या पुराने दाणादाण उडवल्याचे नदी काठावरील गावात वास्तव्यास असलेल्या स्थानिक नागरिकांनी अनुभवले आहे. तालुक्‍यातील रांगणा, भुरकी, जुनी सावंगी, जुनाड, शेलु (खु), झोला, कोना, उकणी या गावांना पुराने कवेत घेतले होते. सध्यस्थीतीत वर्धा नदी ‘सैराट’ झाल्याने स्थानिकांना धडकी भरत असावी हे नाकारता येत नाही.

परतीच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यामुळे प्रशासनाने नदी काठावरील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली त्यातच निम्न वर्धा प्रकल्पातून मंगळवार दि. 13 सप्टेंबर ला सकाळी 11:30 वाजता पासून 31 दरवाजे 100 सेमी ने उघडले आहे. यातून एकूण 2795.49 घन. मी/से. पाण्याचा विसर्ग होणार आहे. यामुळे पुन्हा वर्धा नदी धोक्याची पातळी ओलांडणार का? हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे.
वणी: बातमीदार