Home Breaking News ले. कर्नल वासुदेव आवारी अनंतात विलीन, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

ले. कर्नल वासुदेव आवारी अनंतात विलीन, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

388

शोकाकुल वातावरणात उसळला जनसागर

वणी | अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना हृदयाघाताने निधन झालेले येथील सुपुत्र ले. कर्नल वासुदेव दामोदर आवारी यांच्यावर शुक्रवारी 11:30 अंत्यसंस्कार करण्यात आले. जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी त्यांच्या जन्मगावी मुर्धोनीत शोकाकुल वातावरणात मोठा जनसागर उसळला होता.

अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर मंगळवारी ले. कर्नल वासुदेव आवारी यांचे अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले. देशसेवा बजावताना वीरगती प्राप्त करणाऱ्या सुपुत्रावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पोलीस पोलीस विभागाच्यावतीने सलामी देण्यात आली. याप्रसंगी ‘भारत माता की जय‘, ‘अमर रहे अमर रहे, शहीद वासूदेव आवारी अमर रहे’, ‘वंदे मातरम’ अशा जयघोषांनी परिसर दणाणून गेला.

अंत्यसंस्काराला आर्मीचे अधिकारी, पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व लोक प्रतिनिधी यांच्यासह परिसरातील हजारोंचा जनसागर उपस्थित होता. उपस्थितांनी त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षांव करत श्रद्धांजली वाहण्यात आली.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, विश्वास नांदेकर, राजू उंबरकर, तारेन्द्र बोर्डे, विजय चोरडिया, संजय देरकर यांनी पार्थिवावर पुष्पांजली अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्काराच्या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, तहसीलदार निखिल धुळधर, ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांची उपस्थिती होती.

शोकसंवेदना व्यक्त करताना स्व. वासूदेव यांचे वडील दामोदर आवारी यांनी त्यांच्या बालपणीच्या व तरुणपणीच्या आठवणींना उजाळा दिला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख असले तरी मातृभूमीचे रक्षण करताना त्याला वीरगती प्राप्त झाली याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित जनसागर भावूक झाला होता.

ले. कर्नल वासुदेव आवारी यांचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे आहे. त्यांचे मागे वडील ह.भ.प. डॉ. दामोधर आवारी, आई विजया, भाऊ श्रीकांत, पत्नी निकिता व त्यांना चार वर्षाचा अव्यान हा मुलगा आहे.
वणी: बातमीदार