● वणी पोलिसांची कारवाई
● त्या आलिशान वाहनाचा मालक कोण ?
रोखठोक | शहरालगत असलेल्या महादेव नगरी परिसरात पांढऱ्या रंगाचे आलिशान वाहन संशयास्पद अवस्थेत उभे असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तडक धडक देत वाहनांची झाडाझडती घेतली असता त्या वाहनात प्रतिबंधित तंबाखूचा साठा आढळून आला. ही कारवाई रविवार दि. 25 डिसेंबर ला मध्यरात्री करण्यात आली.
वणी परिसरात प्रतिबंधित तंबाखूची तस्करी पूर्वापार सुरू आहे. या अवैद्य व्यवसायातून अनेक तस्कर गब्बर झाले आहेत. पोलिसांनी अनेक कारवाया केल्या आहेत मात्र संबंधित विभागाकडून योग्य ती मदत मिळत नसल्याने प्रतिबंधित तंबाखू विक्रेते मोकाट फिरताहेत किंबहुना कायद्याच्या चौकटीतुन पळवाट शोधताहेत.
महादेव नगरी परिसरात यापूर्वी मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर बऱ्याच कालावधीने रविवारी पोलीस उप निरीक्षक प्रवीण हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी महादेव नगरी परिसरात वॅगनआर क्रमांक MH-31- DC – 4775 या संशयास्पद अवस्थेत उभे असलेल्या वाहनांची तपासणी केली. यावेळी मोठया प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू आढळून आल्याने तंबाखूसह ते वाहन ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायानंतर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. या घटनेतील खऱ्या म्होरक्यावर गुन्हे नोंद होणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वणी : बातमीदार