● खा.प्रतिभा धानोरकर यांचा घाणाघात
● विजयानिमित्त भव्य विजयी रॅली व सभा
Political News |: सत्तेत असताना भाजपने हुकुमशाही गाजवली. त्यांनी चुकीच्या पद्धतीने सरकार चालवले. सर्वसामान्य जनते विरोधात निर्णय घेतले. भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज आला होता. यावेळी मतदारांना भाजपची हुकुमशाही हाणून पाडायची संधी होती. त्यामुळे मतदारांनी भाजपची सत्तेची गुर्मी उतरवण्याचे काम केले. असे प्रतिपादन खा. प्रतिभा धानोरकर यांनी केले. गुरुवारी संध्याकाळी वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रतिभा धानोरकर यांच्या विजयानिमित्त आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत त्या बोलत होत्या. While in power, BJP exercised dictatorship. He ran the government in a wrong way.
विजयानंतर पहिल्यांदाच खा. प्रतिभा धानोरकर यांनी वणीला भेट दिली. त्यानिमित्त वणीत विजयी रॅली व आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवतीर्थ येथे त्यांची लाडूतुला करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून विजयी रॅलीला सुरुवात झाली. यावेळी ढोलताशाच्या गजरात व गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला.
आयोजित विजयी रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, गांधी चौक, काठेड ऑइल मिल, सुभाषचंद्र बोस चौक, सर्वोदय चौक, आंबेडकर चौक असे मार्गक्रमण करीत छत्रपती शिवाजी चौकात या रॅलीची सांगता झाली. रॅलीनंतर याच ठिकाणी आभार सभेला सुरुवात झाली.
सभेत खा. धानोरकर म्हणाल्या की, मला 7 लाख मते मिळाले असले तरी मी 18 लाख नागरिकांची प्रतिनिधी आहे. ज्यांनी मत दिले नाही त्याचे काम देखील काम करण्याची हमी मी देते. अनेक रस्ते आणि पूल अर्धवट अवस्थेत आहेत ते पूर्ण करण्यावर भर राहील. मतदारसंघात मोठे प्रकल्प आणणे, सिंचनाची व्यवस्था करणे, रोजगाराची समस्या सोडवणे, टेक्सटाईल पार्क आणणे, महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय राहणार, असे आश्वासन त्यांनी सभेत दिले. निवडणुकीत अनेक भाजप नेत्यांनी पडद्यामागून मदत केली, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी भाषणातून केला.
कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती तर वामनराव कासावार, विश्वास नांदेकर, संजय देरकर, नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर, टीकाराम कोंगरे, डॉ. महेंद्र लोढा, विजय नगराळे, संध्या बोबडे, डॉ. भाऊराव कावडे, डॉ. मोरेश्वर पावडे, राजाभाऊ पाथ्रडकर, पुरुषोत्तम आवारी प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, उत्तम गेडाम, अजय धोबे, राजू येल्टीवार, संदीप बुरेवार इत्यादी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय खाडे यांनी केले. ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही होती. त्यामुळे हा संविधान मानणा-या सर्वांचा हा विजय आहे, असे मनोगत यावेळी त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन विवेक मांडवकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार घनश्याम पावडे यांनी मानले. कार्यक्रमाला वणी विधानसभा क्षेत्रातील मविआ व इंडिया आघाडीच्या घटकपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Rokhthok News