● माणुसकीने गहिवरला परिवार
Big News | कमालीची आर्थिक विवंचना, त्यातून आलेले नैराश्य यामुळे टोकाचे पाऊल उचलत 59 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने विषाचा घोट घेतला. कर्ताधर्ताच गेल्याने परिवारावर मोठे संकट कोसळले. खचलेल्या कुटूंबाला मानसिक आधार, सांत्वन व धैर्य देण्याकरिता संजय खाडे यांनी रासा येथील त्यांच्या घरी भेट दिली. विचारपूस करताना मृतक शेतकरी पुत्राची शैक्षणिक पात्रता बघता त्याला तात्काळ आपल्या संस्थेत नोकरीवर कायम स्वरूपात रूजू करून घेतले. Job given to suicide farmer’s son
यवतमाळ जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचा श्राप लागला की काय हे कळायला मार्ग नाही. अस्मानी व सुलतानी संकटाचा ससेमिरा सुटता सुटत नाही. त्यातच कर्जबाजारीपणाची किनार बळीराजाला आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवतोय. आत्महत्येची धग सातत्याने वाढताना दिसत आहे. कुठे ना कुठे दररोज शेतकरी टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहे.
वणी तालुक्यातील रासा येथे वास्तव्यास असलेले अल्पभूधारक शेतकरी यशवंत गणपत वरारकर (59) यांनी टोकाचे पाऊल उचलत दिनांक 2 जुलैला विष प्राशन केले. उपचारादरम्यान 4 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्मघाती निर्णयाने संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
रासा शिवारात असलेल्या तीन एकर शेतीच्या भरवश्यावर ते आपल्या परिवाराचा गाडा हाकत होते. मागील अनेक वर्षांपासून सततची नापिकी व कर्जबाजारीपणामूळे ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. कौटुंबिक जबाबदारी व सततची चिंता यातून आलेल्या नैराशातून त्यांनी मृत्यूला कवटाळले.
यशवंत वारारकर यांच्या पश्चात पत्नी, एक अविवाहीत मुलगा व दोन विवाहीत मुली असा आप्तस्वकीय परिवार आहे. संपूर्ण परिवार मानसिकदृष्ट्या खचलेला होता, त्यांचं सांत्वन करावं, त्यांना धीर द्यावा म्हणून काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी त्या परिवाराची भेट घेतली.
मृतक शेतकरी यांच्या मुलाची विचारपूस करत असताना त्यांना कळलं की, मुलाचे शिक्षण B.Com, MS-CIT, GCC Typing झाले आहे. त्याचे शिक्षण व संगणकीय कौशल्य बघून संजय खाडे यांनी त्याला तत्काळ त्यांच्या संस्थेत नौकरीवर कायम स्वरूपात रूजू करून घेतले. खाडे यांच्या कृतीमुळे परिवार गहिवरला, ग्रामस्थांनी आभार मानले. खाडे यांनी दाखवलेल्या माणुसकीचे परिसरात कौतुक होत आहे.
Rokhthok News