● चिमुकलीच्या डोक्यावरील मायेचं छात्र हरपलं
● भोयर कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर
Sad News :
वणी शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. संतोष भोयर यांच्या पत्नी तथा त्वचारोग तज्ज्ञ डॉ. प्रियंका भोयर यांचे शुक्रवार दिनांक 27 जूनला पहाटे अचानक निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय अवघे 37 वर्षे होते. डॉ. प्रियंका यांच्या अनपेक्षित “एक्झिट” ने भोयर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Dermatologist Dr. Priyanka Bhoyar passes away.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. प्रियंका या गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे झोपल्या होत्या. मात्र शुक्रवारी सकाळी त्या झोपेतून उठल्या नाहीत. काही वेळातच ही बाब त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आली. तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली, परंतु तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते.
झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन डॉ. प्रियंका यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण आद्यप स्पष्ट झाले नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
डॉ. भोयर दाम्पत्याचे गांधी चौक येथे ‘वात्सल्य बाल रुग्णालय’ हे खासगी रुग्णालय असून, दोघेही आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. डॉ. प्रियंका ह्या एक कुशल त्वचारोग तज्ज्ञ व अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर ते कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पती डॉ. संतोष भोयर व सात वर्षांची मुलगी असा परिवार आहे. डॉ. प्रियंका यांच्या जाण्याने मुलीच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपले असून, भोयर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
(रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)






