● देरकर व उंबरकर यांची ग्वाही
● वणीतील राजकीय समीकरणे बदलणार
Political News :
मुंबईच्या वरळी डोममध्ये झालेल्या ऐतिहासिक मेळाव्यात मराठी अस्मितेची वज्रमूठ संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली. ठाकरे बंधूंची एकजूट आणि त्यामधून उमटलेला मराठी आवाज आज राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभेतील राजकीय समीकरणे आमूलाग्र बदलण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. The unity of the Thackeray brothers and the Marathi voice that emerged from it
या मेळाव्यात विद्यमान आमदार संजय देरकर आणि मनसेचे तेजतर्रार नेते राजू उंबरकर यांनी एकत्रित येत पुढील निवडणुका एकत्र लढण्याची जाहीर ग्वाही दिली. हा निर्णय केवळ वणी विधानसभा नव्हे, तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे.
वणी शहरासह उपविभागातील राजकीय समीकरणे पाहता, शहरी भागात मनसेची पकड आहे, तर ग्रामीण भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मजबूत स्थितीत आहे. ही दोन्ही ताकदी एकत्र येणार असल्याने वणी विधानसभा मतदारसंघात एक मोठं आव्हान इतर राजकीय पक्षांसमोर उभं राहील, हे निश्चित.
या ऐतिहासिक एकत्रित निर्णयानंतर वणी विधानसभेत शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांत जल्लोषाचे वातावरण आहे. शहरी भागात मनसेचा तर ग्रामीण भागात शिवसेनेचा प्रभाव आहे. वणी पालिकेवर शिवसेनेसोबतच मनसेने सुद्धा सत्ता काबीज केलेली असल्याने आगामी निवडणूका रंगतदार होणार आहे. तर दोन्ही पक्षाच्या कट्टर समर्थकांनी ‘मराठी एकीचे नवे पर्व’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
वरळी डोमवर झालेल्या या सभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र मंचावर उपस्थित होते. दोन्ही बंधूंनी एकमेकांबद्दल सन्मानाचे शब्द उच्चारत मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्यभरातून आलेल्या मराठी बांधवांच्या साक्षीने ही एकजूट अधिक बळकट झाली.
राजकीय जाणकारांच्या मते, मनसे व शिवसेना(उबाठा) यांची ही युती फक्त विधानसभेपुरती न राहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत विस्तारू शकते. वणीतील आगामी राजकारण अधिक रंगतदार आणि चुरशीचे होणार हे निश्चित आहे.
“मराठी स्वाभिमानाचा नवा झेंडा आता वणीच्या भूमीत फडकणार आहे. मनसे नेते राजू उंबरकर आणि आमदार संजय देरकर यांचा हा निर्णय जनतेच्या मनात नवा उत्साह निर्माण करणारा आहे.”
संजय निखाडे
जिल्हाप्रमुख, शिवसेना (उबाठा)
Rokhthok News






