
● टाकळी परिसरात वाघाचा धुमाकूळ
● ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट
Big News :
वणी तालुक्यातील टाकळी गाव व परिसरात वाघाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पट्टेदार वाघाने गायीचा फडशा पाडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरपंच ज्ञानेश्वर टोंगे यांच्या नेतृत्वात वनविभागाला निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. Tiger attack: Striped tiger kills cow
प्राप्त माहितीनुसार, टाकळी येथे वाघाने गुलाब टोंगे यांची गाय ठार केली असून अनिल टोंगे यांची कालवड गंभीर जखमी केली आहे. याशिवाय येनक येथील आत्राम यांची गायही वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडली. या घटनांमुळे टाकळी, चिखली, येनक आणि कोलगाव परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
वेस्टर्न कोल फिल्डस कंपनीच्या मातीच्या ढिगा-यांवर येड्या बाभळीचे प्रचंड जंगल वाढल्यामुळे रानटी जनावरांचा अधिवास वाढलेला आहे, त्यामूळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत असून या बाबतीत सरकार आणि वे.को.लि.प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
लगतच भवानी मातेचे प्रसिध्द मंदिर असल्याने भाविकांची सतत वर्दळ असते, आणि शाळेत जाणारे विद्यार्थी यामूळे हा परिसर गजबजलेला असल्याने वाघाचे वावरणे, जनतेच्या दृष्टीने प्राणघातक ठरेल की काय अशी भिती निर्माण झालेली आहे.
शेतकरी वर्ग आपल्या शेतामध्ये किंवा जंगलालगत जाण्यास घाबरत असून दैनंदिन जीवनावरही याचा परिणाम होत आहे. गावकऱ्यांनी वनविभागाकडे तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच हल्ल्यात जनावरे गमावलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
ROKHTHOK