● 23 मे ला देणार शेतकऱ्यांची थकीत रक्कम
वणी: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात व्यापाऱ्याने सोयाबीनची खरेदी केली मात्र चुकारे दिले नव्हते. एक कोटीच्या वर रकमेचा गंडा घातला होता. सभापती व सचिवांच्या बेजबाबदारपणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याने त्यांनी उपोषणाचे हत्यार उगारले आणि अखेर बाजार समिती नमली. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम आठ दिवसात देण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात पाच महिन्यांपूर्वी धीरज अमरचंद सुराणा या व्यापाऱ्याने तब्बल 147 शेतकऱ्यांचे जवळपास 1 हजार 935 क्विंटल सोयाबीनची खरेदी करून तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांचा चुकारा थकवला होता. या प्रकरणी सुराणा यांचेसह जामीनदार रुपेश कोचर या दोघांवर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
इनाम योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचा चुकारा 24 तासात अदा करणे अभिप्रेत असताना ‘त्या’ ठगबाजाने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. याबाबत शेतकऱ्यांनी बाजार समिती कडे तक्रारी सुद्धा केल्यात मात्र त्या व्यापाऱ्यांचा बाजार समिती यार्डात असलेला माल रोखण्याचे सौजन्य बाजार समिती प्रशासनाने दाखवले नाही आणि यामुळेच शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
सुराणा व कोचर या व्यापाऱ्यांची बाजार समितीत माल विकत घेण्याची व शेतक-यांना पैसे देण्याची ऐपत न तपासता सभापती व सचिवांनी त्यांना बाजार समितीत व्यापार करण्याचा परवाना दिल्यानेच फसगत झाल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यांनी निवेदनातून केला होता. तर साखळी उपोषणाचे हत्यार उगारले होते.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या उपोषण स्थळी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी भेट दिली तर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तर बाजार समितीच्या सचिवांनी स्वनिधीतून दि. 23 मे ला उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्याची लेखी हमी दिल्याने शेतकऱ्यांनी उपोषणाची सांगता केली.
वणी: बातमीदार