● कार्यकर्ते व वणीकर स्वागतासाठी सज्ज
रोखठोक | पक्षनिष्ठ कार्यकर्ता राजू उंबरकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी वर्णी लागताच कार्यकर्त्याचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. नेते झाल्यानंतर प्रथमच शनिवार दि. 25 मार्चला सायंकाळी 6 वाजता त्यांचे आगमन होत आहे. कार्यकर्ते व वणीकर स्वागतासाठी सज्ज झाले असून शिवतीर्थावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी अठरा वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. त्यांच्या ज्वलंत विचाराने प्रेरित होऊन राजू उंबरकर यांनी मनसेत रीतसर प्रवेश केला. तरुणांमध्ये राज ठाकरे यांची प्रचंड ‘क्रेझ’ आहे ही बाब हेरून उंबरकर यांनी संघटना बांधणीकडे विशेषत्वाने लक्ष दिले.
वणी विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण व शहरीभागात तरुणाची फौज निर्माण करत जनहितार्थ आंदोलनाचा सपाटा लावला. पराभवाची पर्वा न करता सतत जनआंदोलने करण्याचा विडा उंबरकर यांनी उचलला आणि पक्ष प्रमुखाने नेतेपदाची जबाबदारी सोपवली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता ते पक्ष नेतेपद ही बाब वणीकर नागरिक व विदर्भातील महाराष्ट्र सैनिकांसाठी उत्साहवर्धक नक्कीच आहे. शनिवारी मुंबई वरून ते येताहेत, त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी ठिकठिकाणी करण्यात आली आहे. येथील शिवतीर्थावर जंगी स्वागत होणार असून कार्यकर्ते व वणीकर स्वागतासाठी सज्ज आहेत.
वणी: बातमीदार