● अपक्ष उमेदवारांनी राजकीय पक्षाला फोडला घाम
रोखठोक | ग्रामपंचायतीच्या निवडणुका अतिशय रंगतदार व चुरशीच्या होत असतात. मतदार योग्य निर्णय घेत असल्याचे चिञ मतमोजणीअंती स्पष्ट झाले. वणी विधानसभा मतदार संघात भाजपाचा झंझावात दिसत असला तरी शिवसेना दुसऱ्यास्थानी आहे. तालुक्यात सरपंच पदावर भाजपाचे 9 तर शिवसेनेचे 4 उमेदवार निवडून आले. तीन ठिकाणी अपक्ष तर कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसचा प्रत्येकी 1 उमेदवार निवडून आला.

वणी तालुक्यात 19 ग्रामपंचायतीच्या सार्वञीक निवडणुका पार पडल्या. यापैकी अहेरी येथील निवडणुक अविरोध तर शिंदोला येथे ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. अहेरी येथे राष्ट्रवादीचा उमेदवार सरपंच झाला आहे. 17 ग्रामपंचायतीकरीता निवडणुक घेण्यात आली यामध्ये भाजपा, शिवसेना कॉग्रेस व मनसेने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले होते.

तालुक्यातील चिखलगांव, गणेशपुर ह्या मोठया ग्रामपंचायती स्थानिक पुढाऱ्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. शहरालगत असलेल्या या ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जातात. गणेशपुर येथे भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर चिखलगांव येथे सुनील कातकडे यांनी झंझावती विजय मिळवत विरोधकांना चित केले आहे.
तालुक्यातील गणेशपुर, मंदर, वेळाबाई, वरझडी, ब्राम्हणी, रांगणा, चारगांव, साखरा दरा, वारगांव येथील सरपंचपदी भाजपाने झेंडा फडकवला आहे. तर बोर्डा, कुरई, कळमना व चिखलगांव येथे शिवसेनेने आपले सरपंच पदाचे उमेदवार निवडुन आणले आहे. कायर, केसुर्ली व पुरड येथे माञ अपक्ष उमेदवाराने राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पराभुत केले आहे. कॉग्रेसला माञ मेंढोली या एकमेव जागेवर समाधान मानावे लागले.
वणी : बातमीदार
● ग्रामपंचायत निहाय सरपंच ●
मंदर -वर्षा अनंता बोढे, रांगणा- प्रकाश बोबडे, बोर्डा- आशा झाडे, कुरई – स्वाती विजय झाडे, चारगाव -शंकर वालकोंडे, कायर – नागेश धनकासार, वेळाबाई – रजनी बांदूरकर, वरझडी – सुवर्णा भोयर, ब्राम्हणी -गीता नामदेव राजगडे, वारगाव – रखमाबाई प्रमोद पिंपळकर, गणेशपूर- आशा मनोज जुनगरी, कळमना- रंजना सचिन अगीरकार, साखरा दरा – रजनी अशोक पिदूरकर, केसुर्ली – मंगेश सुरेश काकडे, मेंढोली – सविता विनायक ढवस, पुरड (ने) – गणेश बापूराव टेकाम, चिखलगाव – रुपाली सुनील कातकडे
● बारा ग्रामपंचायतीत महिला राज●
तालुक्यातील 19 ग्रामपंचायती पैकी बोर्डा, ब्राम्हणी, गणेशपूर, कुरई, मंदर, मेंढोली, साखरा (दरा), वारगाव, वरझडी, वेळाबाई, चिखलगाव व कळमना या बारा ग्रामपंचायतीत महिलाराज असणार आहे.