● गोरखधंद्याचे रॅकेट परिसरात सक्रिय
वणी | तालुक्यातील बोर्डा येथे वास्तव्यास असलेल्या शेतकऱ्यांची शेती बनावट दस्तऐवजाच्या आधारे परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उजागर झाला. याप्रकरणी तेलंगणा राज्यातून दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. शेती हडपणाऱ्या गोरखधंद्याचे रॅकेट पुन्हा सक्रिय झाल्याचे अधोरेखित होत आहे.

गुडीपत्ती महेंदर प्रताप रेड्डी (35) रा. लसकामापल्ली, मंडल विनावांका, जि. करिमनगर व करासाई चंदू श्रीधर रेड्डी (22) रा.कोरकल, मंडल विनावांका, जि. करिमनगर असे ताब्यातील आरोपीची नावे आहेत. बोर्डा येथील शेतकरी सखाराम वाभिटकर (68) यांची वडिलोपार्जित 1 हेक्टर 62 आर शेती रासा शिवारात आहे. त्या शेतीची वहिती करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात.
जानेवारी 2021 मध्ये स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्याला “तुम्ही शेती विकली का ? अशी विचारणा केली कारण त्या शेतीची फेरफार साठी कागदपत्र प्राप्त झाली होती. हे ऐकताच वाभिटकर यांना धक्काच बसला. त्यांनी तडक दुय्यम निबंधक कार्यालयाकडे धाव घेत शहानिशा केली आणि पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली होती.
शेतकऱ्यांचे बनावट आधारकार्ड, दस्तऐवज तसेच खोट्या स्वाक्षरीनिशी शेती, विक्री करिता दुय्यम निबंधक कार्यालयाकडे सादर केला. खरेदी व विक्री करणारे दोघेही अनोळखी. वाभिटकर यांची शेती दोघांच्या नावे प्रत्येकी 0.81 आर प्रमाणे परस्पर करण्यात आली. यात प्रमुख भूमिका नेमकी कोणी बजावली हे तपासणे गरजेचे आहे.
याप्रकरणी वणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपींना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शिवाजी टिपूर्णे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत तांत्रिक बाबी अवलंबत आरोपींचा छडा लावला. CDR च्या माध्यमातून दोघांना तेलंगणातुन ताब्यात घेत फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे..
अशाच प्रकारच्या घटना परिसरात यापूर्वी सुध्दा घडल्या आहेत. बनावट दस्तऐवजाच्या आधारे शेती हडप करणाऱ्या रॅकेट चा पर्दाफाश करणे गरजेचे असून योग्य तपासाअंती आरोपीची संख्या वाढणार हे निश्चित.
वणी: बातमीदार