● तब्बल 80 लाखाने फसवणूक
वणी: शहरातील व्यावसायिक तसेच एका राजकीय पक्षांचा स्वयंघोषित कार्यकर्ता असलेल्या व्यक्तीने नागपूर येथील कोळसा व्यावसायिकाची फसवणूक केली. या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवार दि. 9 मार्चला नागपूर पोलिसांनी ‘त्या’ आरोपीला वणीतून अलगद उचलले.

मनीष शामसुंदर बत्रा, रा. बेलदारपुरा असे आरोपींचे नाव असून ते कोळसा व्यावसायिक आहेत. लालपुलिया परिसरात एस.बी. ट्रेडर्स नामक त्याचा कोलडेपो आहे. कोळशाची खरेदी आणि विक्री ते करतात. वर्धमान नगर नागपूर ला वास्तव्यास असलेल्या नितीन मुरलीधर अग्रवाल यांच्या मित्तल एनर्जी ऑफ इंडिया या कंपनीने बत्रा यांच्या मागणीवरून सन 2016-17 मध्ये तब्बल 2 कोटी रुपयांचा कोळसा पुरवठा केला.
लालपुलिया परिसरातील एस.बी. ट्रेडर्सच्या कोळसा डेपो लगतच नागपूर येथील प्रमोद भाबडा यांचा कोल डेपो होता. मित्तल एनर्जी ऑफ इंडिया कंपनीने भाबडा यांच्या मार्फत मनीष बत्रा यांना कोळसा विकला होता. यातील 80 लाख रुपये थकविल्याने त्यांच्यात वेळोवेळी बैठका झाल्यात यावेळी प्रतिमाह 15 लाख रुपये देण्याचे बत्रा यांनी कबूल केले.
वाद विकोपाला न जाता दोन्ही बाजूने तोडगा निघावा याकरिता प्रयत्न करण्यात आले. ऑगस्ट 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत दरमहा 15 लाख रुपये देण्याचा करारनामा करण्यात आला आणि येथेच गफलत झाली. बत्रा याने रक्कम देण्यास टाळाटाळ करताच नितीन अग्रवाल यांनी जून 2021 मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली.
नागपूर येथील कोळसा व्यावसायिकाने मनीष बत्रा याचे विरोधात खटला दाखल केला. न्यायालयाच्या आदेशावरून लकडगंज पोलिसांनी 11 फेब्रुवारी 2022 रोजी या प्रकरणी कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला. चौकशीअंती पोलिसांनी गुरुवारी त्याला त्याच्या प्रतिष्ठानातून उचलले. या प्रकरणामुळे काळ्या कोळशाच्या काळ्या कारनाम्याचा उलगडा मात्र झाला आहे.
वणी: बातमीदार