● लोकसंख्येच्या आधारावर शासनाचा निर्णय
लोकसंख्येच्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा वाढवण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे नगरपालिकाप्रमाणेच लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जागा वाढवण्यात येणार असल्याने वणी तालुक्यातील जिल्हा परिषदेची 1 तर पंचायत समितीच्या 2 जागा वाढणार आहेत.

वणी तालुक्यात शिंदोला- शिरपूर, लाठी- लालगुडा, राजूर – चिखलगाव व घोन्सा – कायर असे 4 जिल्हा परिषद गट आहे तर शिंदोला, शिरपूर, लाठी, लालगुडा
राजूर, चिखलगाव, घोन्सा व कायर असे 8 पंचायत समिती गण आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जागा वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील समीकरणांमध्ये मोठा बदल होणार आहे. या वाढलेल्या जागांनुसार राजकीय पक्षांना आपली रणनीती ठरवावी लागणार आहे.
शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 2000 वरुन 2248 इतकी होईल. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील 4000 वरुन 4496 इतकी होईल. सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे.
सध्यस्थितीत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 4 तर पंचायत समितीच्या 8 जागा आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या इच्छुकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
राज्य शासनाच्या निर्णयामुळे लोकसंख्येच्या आधारावर तालुक्यातील वाढणारी जागा नेमकी कोणत्या भागातील असेल हे अद्याप स्पष्ट झाले नाहीत. मात्र सर्वच राजकीय पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समिती करिता बलाढ्य उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.
वणी: बातमीदार