Home Breaking News त्या…दुहेरी हत्याकांडातील मुलाचा मृतदेह शिळोना घाटात आढळला

त्या…दुहेरी हत्याकांडातील मुलाचा मृतदेह शिळोना घाटात आढळला

पिता-पुत्राचे अपहरण करून निर्घृण हत्या

उमरखेड : नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतमजूर असलेल्या पिता-पुत्राचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. जमिनीत पुरलेल्या अवस्थेत पित्याचा मृतदेह कुंडलवाडी पोलिसांच्या हाती लागला होता. मात्र, मुलाचा मृतदेह गवसत नव्हता. मंगळवारी दुपारी पोफाळी नजीकच्या शिळोणा घाटातील नाल्यात त्या हत्याकांडातील पुत्राचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ माजली.

राजस्थान येथून शेतमजूरीसाठी आलेल्या एका पिता-पुत्राचे काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झाले होते. पोलीस तपासादरम्यान त्यातील पित्याचा कुंडलवाडी परिसरातील एका निर्जनस्थळी जमिनीत पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मात्र, मुलाचा थांगपत्ता लागत नव्हता.

मंगळवारी दुपारी काही नागरिकांना पोफाळी नजीकच्या शिळोणा घाटात कुजल्यासारखा वास आल्याने त्यांनी तेथे जाऊन पाहिले. तेव्हा कुजलेल्या अवस्थेत एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोफाळीचे ठाणेदार राजीव हाके आणि उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी हे तत्काळ पथकासमवेत तेथे दाखल झालेत.

Img 20250103 Wa0009

पंचनामा करून या तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच वर्णनाच्या एका तरुणाचा कुंडलवाडी पोलीस शोध घेत असल्याचे पुढे आले. कुंडलवाडी पोलीस तेथे पोहोचताच त्यांनी त्या तरुणाची ओळख पटविली. दरम्यान, कुंडलवाडी येथील दुहेरी हत्याकांडाचे गुढ आता उकलल्या गेले आहे. एवढेच नव्हेतर या दुहेरी हत्याकांडातील मारेकरी हे मध्यप्रदेशातील असल्याचेही पुढे आले आहे.
उमरखेड: बातमीदार