● पीडित शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
● आठ दिवसाचा अल्टीमेटम
वणी: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात पाच महिन्यांपूर्वी दोन व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदी करून एक कोटी रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना रक्कम देण्याची सर्वस्वी जबाबदारी सभापती व सचिवांची होती. मात्र शेतकऱ्यांना अद्याप रक्कम प्राप्त झालेली नसल्याने ‘त्या’ चौघांनी संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप SDO यांना दिलेल्या निवेदनातून केल्याने बाजार समितीची लक्तरे चव्हाट्यावर टांगली गेली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 5 ते 7 जानेवारी पर्यंत परवाना धारक व्यापारी धीरज अमरचंद सुराणा व त्याचा जमीनदार रुपेश नवरत्नमल कोचर यांनी शेतकऱ्यांकडून सोयाबीन विकत घेतले. बाजार समिती मार्फत अर्जदारांना बिल व वजनाच्या पावत्या देण्यात आल्या. मात्र अद्याप रक्कम देण्यात आली नाही. इनाम योजने अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव व सभापती यांची 24 तासाचे आतं शेतक-यांना विकलेल्या मालाची रक्कम देण्याची जबाबदारी आहे.
धीरज अमरचंद सुराणा व त्याचा जमीनदार रुपेश नवरत्नमल कोचर या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुराणा या व्यापाऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात 5 ते 7 जानेवारी व 10, 11 जानेवारीला 147 शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी करून 147 शेतकऱ्यांचे जवळपास 1 हजार 935 क्विंटल सोयाबीनची खरेदी करून तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांचा चुकारा थकवला होता.
सुराणा व कोचर या व्यापाऱ्यांची बाजार समितीत माल विकत घेण्याची व शेतक-यांना पैसे देण्याची ऐपत न तपासता सभापती व सचिवांनी त्यांना बाजार समितीत व्यापार करण्याचा परवाना दिला. यामुळेच ‘त्या’ चौघांनी शेतका-यांची आर्थीक फसवणुक केल्याचा घणाघाती आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. तसेच त्या सर्वांवर तातडीने गुन्हा नोंद करण्यात यावा व शेतमालाची रक्कम त्यांच्या कडून वसुल करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
आर्थिक पीडित 26 शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत तातडीने निर्णय घ्यावा तसेच 24 तासाच्या आत मागण्या मंजूर कराव्यात व संगनमताने फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करावी असे साकडे घातले आहे. अन्यथा 18 मे ला आंदोलन व साखळी उपोषण करू व त्यापासुन उध्दभवणा-या परिणामास शासन व संबंधीत यंत्रणा जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.
वणी: बातमीदार