● वणी पोलीस ठाण्यातील निंदनीय घटना
रोखठोक | मानवी संवेदना लयास गेलेली घटना वणी पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. दोन परिवारात चाललेल्या वादाला शांत करण्यासाठी ती महिला पोलीस कर्मचारी सरसावली आणि तिलाच केस पकडून खाली पाडण्यात आले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली, ही बाब अतिशय निंदनीय असून कठोर कारवाई अपेक्षित आहे.

विस्तृत वृत्त असे की, तेलीफैल परिसरातील एक मुलगी आपल्या प्रियकरासोबत घरातून निघून गेली. दोघांनी लग्न केलं आणि काही दिवसांनी ते दोघे थेट पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या घरातील मंडळी सुद्धा पोहचली.
लाडक्या मुलीने कुटुंबाच्या मनाविरुद्ध लग्न केल्याने तो परिवार संतप्त होताच. पोलीस ठाण्यात दोन्ही परिवारात वादावादी सुरू झाली. एकमेकांचा उद्धार सुरू होता, वाद वाढत असल्याने कर्तव्यावर असलेली महिला पोलीस कर्मचारी तेथे पोहचली. पोलीस ठाण्याच्या आवारात एकमेकांसोबत वाद घालू नका म्हणून तिने दोन्ही परिवाराला समजावले.
ऐकण्याच्या मानसिकतेत नसलेल्या त्यातील एका महिलेने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे केस पकडून खाली पाडले. घडलेली घटना अतिशय निंदनीय असून पोलीस ठाण्याच्या आवारात घडल्याने गांभीर्य वाढले आहे. या घटनेमुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वणी : बातमीदार