● रंगनाथची निवडणूक परिवर्तनच्या दिशेने
वणी: अतिशय चुरशीची होत असलेल्या श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन व जय सहकार पॅनल मध्ये अटीतटीची लढत होत आहे. त्यातच ‘परिवर्तन ला अभिकर्त्यांचा पाठिंबा’ असा मॅसेज व्हायरल झाल्याने तारांबळ उडाली. आरोप प्रत्यारोपच्या फैरी समाज माध्यमावर झडायला लागल्या.

करोडोची उलाढाल असणारी श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक होत आहे. 800 कोटींची वार्षिक उलाढाल, तब्बल 42 हजार सभासद आणि 22 शाखा आहेत. संस्थेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ऍड. भास्कर ढवस, जय आबड, इझहार शेख, नम्रता तांबेकरं, मोरेश्वर पावडे, भाऊराव कावडे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनल निवडणूक रणांगणात उभे ठाकले आहे.
परिवर्तन पॅनलला काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार वामनराव कासावार यांचेसह काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. पतसंस्थेच्या सभासदांना आकृष्ट करण्यासाठी पत पुरवठा धोरण, संस्थेच्या प्रगती व उन्नतीसाठी विविधांगी व ठोस जाहीरनामा सादर केला आहे.
संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा मोठा वाटा आहे तसेच दैनिक वसुली अभिकर्ता यांची मोलाची भूमिका राहिली आहे. त्यातच शुक्रवारी ‘परिवर्तन ला अभिकर्त्यांचा पाठिंबा’ असा संदेश समाज माध्यमावर झळकला.
व्हायरल झालेल्या त्या मॅसेज मुळे अभिकर्ते नेमके कोणत्या दिशेने वाटचाल करताहेत हे विरोधकांना कळलेच नाही. यामुळेच समाज माध्यमातून आरोप प्रत्यारोप होत असले तरी एकूणच रंगनाथ ची निवडणूक उत्कंठावर्धक स्थितीत येवून ठेपली आहे.
वणी: बातमीदार