● आमदारी घाटातील घटनेने खळबळ
वणी | पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आमदारी घाटात 19 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली. ही घटना सोमवारी 5 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या अमानुष हत्येचे रहस्य उलगडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

गजानन बंडू ढोले (19) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो मांडवा येथील निवासी असून तो मामाच्या घरी जाण्यासाठी रविवारी 4 सप्टेंबर रोजी दुपारी घरून निघाला होता. परंतु उशीरापर्यंत मामाच्या गावी पोहोचला नाही त्यामुळे तो नेमका कुठे गेला यामुळे घरची मंडळी चिंतेत होती.
दुसऱ्या दिवशी आमदरी घाटात युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतदेहाजवळ कॉलेजबॅग असल्यामुळे युवकाची ओळख तत्काळ पटली. त्याच्या नातेवाईकांना सूचित करण्यात आले. परंतु त्याची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
तरुणाची हत्या का व कशासाठी करण्यात आली याबाबत पोलिसांना काटेकोर तपास करावा लागणार आहे. परिस्थितीजन्य पुरावा व घटनास्थळाचे निरीक्षण आणि तांत्रिक बाबीचे सखोल आकलन करावे लागणार असून खऱ्या मारेकऱ्यांचा छडा लावावा लागणार आहे. मात्र तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वणी: बातमीदार