● विठ्ठलवाडीतील दोघे ‘पॉझिटिव्ह’
कोरोनाची दुसरी लाट ओसारताच नागरिक बिनधास्त झाले होते. कोविड त्रिसूत्रीचे पालन पूर्णतः विसरले आणि दबा धरून बसलेल्या कोरोनाने डाव साधला. दि. 12 नोव्हेंबर ला विठ्ठलवाडी परिसरातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

ऑगस्ट महिन्यानंतर कोरोनाचा एकही रुग्ण शहरात तसेच तालुक्यात आढळला नाही. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला होता मात्र सतर्क राहून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासन नागरिकांना करत होते.
कोरोनाचा विळखा सम्पूष्टात आल्याचे ग्राह्य धरून नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करणे सोडून दिले होते. सणासुदीच्या दिवसात बाजारात तुफान गर्दी आढळून आली. व्यावसायिकांनी देखील कोविड नियमांचे पालन तंतोतंत केले नाही.
काही दिवसांपासून वातावरणाच्या बदलामुळे विविध आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयात रुग्ण संख्या वाढत असतानाच शुक्रवारी कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील एक महिला व एका पुरुषांला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी येथील एका खाजगी लॅब मध्ये कोरोनाची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली असून नागरिकांनी कोविड त्रिसूत्रीचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणी: बातमीदार