● आ. बोदकुरवार यांची उपस्थिती
● शेवाळा ते सावंगी रस्ता तात्काळ दुरुस्त करा
वणी: शेवाळा ते सांवगी रस्त्याचे बांधकाम मागील दोन वर्षापासुन कासवगतीने सुरु आहे. ग्रामपंचायतीने अनेकदा निवेदने देऊनही बांधकाम विभाग हेतुपूर्वक दुर्लक्ष करत आहे. स्थानिक नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वात सोमवार दि. 4 एप्रिल ला चक्क PWD कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार प्रामुख्याने उपस्थित होते.

निर्ढावलेल्या PWD विभागाला ताळ्यावर आणण्यासाठी भाजपा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. शेवाळा ते सावंगी या रस्त्याचे बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे. यामुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे मात्र अधिकारी व कंत्राटदार ऐकण्याच्या मानसिकतेत नाही.
रस्त्यावरील गिट्टी पुर्णतः उखडली आहे, छोटे पुलावर स्लॅब न टाकल्याने पावसाळ्यात दोन फुट मातीचा थर साचल्यामुळे चिखलातुन शेतातील माल कापुस, सोयाबीन, तुर इत्यादी घरी आणताना प्रचंड हाल होत आहे. कंत्राटदार येल्टीवार व बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी संगनमतांने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
निवेदनातून विविध मागण्या रेटून धरण्यात आल्या होत्या. यात प्रामुख्याने शेवाळा सावंगी रत्यावरील अर्धवट पुलाचे काम पूर्ण करणे, रस्त्याची दबाई करून रस्ता वाहतुक योग्य करणे, परिसरातील नागरीक, शेतकरी, आजारी रुग्ण, विद्यार्थी या सर्वाना सुविधा होण्याच्या दृष्टिने तातडीने समस्या सोडवावी. नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेता आंदोलनकर्त्यांनी सात दिवसाचा अल्टीमेटम PWD विभागाला दिला होता मात्र कोणतीच कारवाई न केल्याने अखेर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
आंदोलनात आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, गणेश मते, ज्योती मालेकार, धनराज राजगडकर, उमेश मालेकार, गणेश काळे, मदन कोडापे, रत्नमाला कोडापे, विनायक कोडापे, मनीषा आत्राम, शालू ठाकरे, संगीता ठाकरे, प्रणाली ढवस यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
● धरणे आंदोलन आणि अधिकारी गायब ●
पंधरा दिवसापूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी शेवाळा ते सावंगी रस्ता दुरुस्ती बाबत प्रशासनाला निवेदन देत अल्टीमेटम दिला होता. रस्ता दुरुस्ती न केल्यास 4 एप्रिल ला धरणे आंदोलनाचा इशारा दिलेला असताना संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुख्यालयी राहण्याचे निर्देश असताना अधिकारी प्रचंड बेजबाबदार असल्याचे वास्तव समोर आले आहे.
वणी: बातमीदार