● 63 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला उद्या
रोखठोक | सहकार क्षेत्रात महत्वाची समजली जाणारी वसंत जिनिंगची निवडणूक पार पडली. रविवारी प्रथमदर्शनी 7 हजार 291 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत चार बलाढ्य पॅनलच्या माध्यमातून 63 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले असून सोमवारी मतमोजणीत 17 उमेदवार विजयश्री प्राप्त करणार आहेत.
विधानसभा क्षेत्रात वसंत जिनिंग अँड प्रेसिंगची महत्वपूर्ण निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकी करिता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले होते. काँग्रेस पक्षात मात्र वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. काँग्रेसचे दोन गट आपापसात भिडले तर विद्यमान आमदारांनी सुध्दा जिनिंग ताब्यात घेण्याची रणनिती आखली.
ऍड. देविदास काळे यांच्या विरोधातच रणशिंग फुंकण्याचे काम माजी आमदार वामनराव कासावार सातत्याने करताहेत. ‘रंगनाथ’ च्या निवडणुकी दरम्यान विरोधातली भूमिका चोख बजावली होती. काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेसच जबाबदार राहत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार सहकार क्षेत्र ताब्यात यावे या करिता कसोशीने प्रयत्न करताहेत. त्यांनी मतदारसंघात योग्य व पद्धतशीरपणे जाळे विणले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असो की सहकार आपल्या कार्यकर्त्यांना स्थान मिळावे याकरिता ते कठोर परिश्रम घेताहेत.
वसंत जिनिंग च्या निवडणुकीत ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल, आ: संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे शेतकरी एकता परिवर्तन पॅनल, माजी आमदार वामनराव कासावार यांचे परिवर्तन पॅनल व अनिल हेपट यांच्या नेतृत्वाखालील वसंत जिनिंग बचाओ पॅनल अशा चार प्रमुख व तुल्यबळ पॅनलचे 63 उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले.
यावेळी वसंत जिनिंगची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. काँग्रेस विरुद्ध काँग्रेस, भाजपाने सभासदांना दाखवलेला विकासाचा अजेंडा व संस्थेत सुरू असलेला अनागोंदी कारभार असा आरोप करीत निवडणुकीत उतरणाऱ्या भाकप, शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेडने निवडणुकीत चांगलीच रंगत आणली. 10 हजार 924 सभासद मतदार असलेल्या वसंत जिनिंग मध्ये प्रथमदर्शनी 7 हजार 291 मतदारांनी हक्क बजावला असून उमेदवारांचे भाग्य मतपेटीत कैद झाले आहे.
वणी : बातमीदार






