● विभागीय सहनिबंधक यांची नोटीस
रोखठोक | बँक संचालक तथा कंत्राटदार राजीव मल्लारेडडी येल्टीवार व शाखा व्यवस्थापक यांनी संगनमताने रुपये 18 लाख रुपयांची बनावट FDR तयार करून बँकेची व जिल्हा परिषद बांधकाम विभागाची फसवणूक केली होती. या प्रकरणी विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 अ (ब) नुसार नोटीस बजावली असून 15 दिवसांचे आत म्हणने मांडावे व खुलासा समाधानकारक नसल्यास कार्यवाही करण्यांत येईल असे आदेशीत केल्याने बँक संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाटण येथे बँक संचालक येल्टीवार व शाखा व्यवस्थापक यांनी संगनमताने रुपये 18 लाख 10 हजार रुपयांची बनावट संकल्प मुदत ठेवी योजनेच्या पावत्या दि. 16 फेब्रुवारी 2022 रोजी बनवून बँकेची व जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. 1 यवतमाळ यांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विधिमंडळात लक्षवेधी दाखल करत प्रकरण लावून धरले होते.
सहकार मंत्री यांनी लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना शाखा व्यवस्थापकावर कारवाई केल्याचे सांगितले तसेच विशेष लेखा परीक्षा वर्गाकडून चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. याबाबत प्राप्त अहवालानुसार राजेंद्र दाभेराव, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी बँक संचालक येल्टीवार यांना 18 नोव्हेंबरला सुनावणी नोटीस बजावली आहे.
बँक संचालकाला पाठविण्यात आलेल्या नोटीस मध्ये संगणमताने बनावट FDR तयार केले व बँकेमध्ये आर्थिक अफरातफर करण्यामध्ये आपला सहभाग असल्याचे स्पष्ट केले. तसेच संस्थेच्या हितास बाधा आणली असून आपल्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा नोंदविल्याचे नमूद करण्यात आले आहे. करिता आपणा विरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 अ (ब) नुसार कार्यवाही करुन आपणास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म. यवतमाळ या बँकेचे संचालक पदावरुन काढून टाकण्यात का येऊ नये ? अशी विचारणा करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक येल्टीवार यांचेवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने बँक वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणी विभागीय सहनिबंधक यांचे समक्ष नोटीस प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 15 दिवसांचे आत म्हणने मांडावे लागणार आहे. खुलासा मुदतीत न आल्यास अथवा सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्यास उपलब्ध कागदपत्राच्या आधारे सहकारी कायद्यातील तरतुदी नुसार पुढील कार्यवाही करण्यांत येईल असे आदेशीत करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार