● जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे तक्रार
वणी: गुरुवार दि.23 सप्टेंबरला रात्री 12 वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस वाहनातून जमादार विठ्ठल बुरेवार खाली उतरले. शतपावली करत असलेले बार मालक मोरेश्वर उज्वलकर यांना बेदम मारहाण केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडे करण्यात आली आहे.

तक्रारकर्ता मोरेश्वर उज्वलकर यांचे वरोरा मार्गावर लॉर्ड्स नामक बिअर बार आहे. नियमानुसार आपले दुकान बंद करून घरी गेले व जेवण झाल्यानंतर शतपावली करिता मुख्य रस्त्यावर आले होते. तेवढ्यात गस्तीवर असलेले पोलिसांचे वाहन तेथे आले. वाहनातून जमादार विठ्ठल बुरेवार खाली उतरले आणि कोणतीही विचारणा न करता हातातील दांड्याने मारहाण केली. यामुळे डाव्या पायाला दुखापत झाल्याचे तक्रारीतून नमूद करण्यात आले आहे.
अचानक झालेल्या मारहाणीमुळे व्यथित झालेल्या उज्वलकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली.तेथे उपस्थित बुरेवार यांनी पुन्हा शिवीगाळ केली व 4 वाजता पर्यंत बसवून ठेवल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. याप्रकरणी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता गस्त वाढविण्यात आली आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडूनये याची काळजी पोलीस प्रशासन घेत आहे. गुरुवारी मध्यरात्री लॉर्ड्स बार च्या समोर रस्त्यावर दोन व्यक्ती दारू पीत असल्याचे दिसले. मेजर बुरेवार यांनी त्यांना समजावत घरी जाण्यास सांगितले मात्र ते अरेरावी करीत होते. त्यांचे मेडिकल करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाम सोनटक्के
ठाणेदार, वणी