● आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी
तालुक्यातील वेळाबाई येथील पाच तरुणांनी यथेच्छ दारू ढोसली. नेहमीच ते मिळून मिसळून मद्य प्राशन करायचे. घटनेच्या दिवशी रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांच्यात क्षुल्लक वादातून ठिणगी पडली आणि लोखंडी अँगलच्या साह्याने चौघांनी निर्घृणपणे माणुसकीला लाजवेल अशी “आकाश” ची भीषण हत्या केल्याचे CCTV CAMERA FOOTAGE मध्ये कैद झाले आहे.

प्रतीक उर्फ गोलू वडस्कर (24), सोमेश्वर कावळे(19), प्रफुल्ल झाडे (26) व हरिदास ढवळे (32) असे अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत ते वेळाबाई येथील निवासी आहे. घटनेच्या दिवशी हे सर्व पाच मित्र आबई फाटा परिसरातील बार मध्ये दारू सेवन करण्यासाठी गेले होते.
त्या सर्वांनी मनसोक्त दारू ढोसली, या दरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. मृतक आकाश ला दारू चांगलीच चढली, दारूच्या नशेत त्याच्या तोंडून अपशब्द निघाला आणि घात झाला. भाईगिरी ची लत लागलेल्या गोलू ला तो शब्द जिव्हारी लागला. दारू दुकानाच्या अगदी समोर भीषण… निर्घृण, माणुसकीला लाजवेल असे हत्येचे कृत्य त्या चौघांच्या हातून घडले.
पाच फूट लांबीच्या लोखंडी अँगल चा सपासप फटका मृतक आकाश वर बरसत होता. मध्ये..मध्ये तो बेशुद्ध होत असताना अंगात सैतान संचारलेले ते हैवान अंगावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीत आणून मारहाण करीत होते. तालिबानी स्वरूपाचे कृत्य करत असताना प्रत्यक्षदर्शींसमोर गोलू व त्याचे सवंगडी परिसरातील “डॉन” असल्याचे भासवत होते.
मृतकाच्या परिवाराने शिरपुर पोलीसात तक्रार दाखल केली. ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ घटनास्थळ गाठले. अवघ्या काही वेळातच चार आरोपीना ताब्यात घेतले. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता. चार आरोपीना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक राम कांडुरे करीत आहे.
वणी: बातमीदार