● कार्यवाही पासून वाचण्याच्या प्रयत्नात घडला अपघात
वसंत देशमुख-उमरखेड : महसूल चे वाहन येत असल्याचा सुगावा रेती तस्करी करणाऱ्या टिप्पर चालकाला लागला. कार्यवाही पासून वाचण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगाने वाहन हकण्यात आले आणि भीषण अपघात घडला. यात 55 वर्षीय शेतकरी चिरडल्याची घटना गुरुवार दि. 12 मे ला दुपारी 12: 45 वाजता घटना घडल्याने ग्रामस्थांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

मुकिंदा लक्ष्मण मुनेश्वर (55) हे अपघातात मृत्युमुखी पडलेले दुर्दैवी शेतकरी आहेत. ते विडूळ येथील निवासी असून नेहमीप्रमाणे ते शेतातील कामे आटोपून सायकल ने आपल्या घराकडे परतत असताना ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पुलाजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांना धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
देवसरी ते विडूळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेतीचे टिप्पर भरधाव वेगाने चालत असतात. सातत्याने होणाऱ्या रेती तस्करीला प्रशासनाचे अभय मिळत असल्याने मस्तवाल रेती तस्कर कोणालाच जुमानत नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
घटनेच्या दिवशी महसूल चे वाहन घाटाकडे येत असल्याची माहिती रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाला मिळाली. त्याने मुख्य रस्ता सोडून डाव्या कालव्याचा रस्त्याने वाहन टाकण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला.
अपघाताची माहिती मिळताच उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत देशमुख आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी उमरखेड सामान्य रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुजाता बनसोडे करीत आहेत.
उमरखेड: बातमीदार