● दत्त मंदिरासमोर घडला थरार
रोखठोक | जुन्या घरगुती वादामुळे माहेरी वास्तव्यास असलेल्या 40 वर्षीय पत्नीवर पतीनेच चाकूने हल्ला केला. यात ती महिला थोडक्यात बचावली असून हा थरार गुरुवार दि. 15 डिसेंबरला दत्त मंदिरासमोर घडला.

दिवाकर राजगडकर (45) असे हल्लेखोर पतीचे नाव आहे. तो मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील निवासी असून सध्या जळगाव येथे एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहे. त्याची पत्नी अर्चना दिवाकर राजगडकर (40) हिच्या सोबत वाद सुरू होते. यामुळे ती वणीतील विठ्ठलवाडी परिसरात आई- वडिलांच्या घरी राहत होती.
आपली व मुलाची उपजीविका व्हावी म्हणून ती एका खाजगी संस्थेत कामाला होती. घटनेच्या दिवशी ती, मुलगा व मैत्रीण दत्त मंदिरासमोरून जात असताना तिच्या पतीने तिला रस्त्यात गाठले व वाद घालायला सुरुवात केली आणि क्षणात त्याने घरगुती चाकूने सपासप वार केले.
अचानक घडलेल्या घटनेने अर्चना कमालीची घाबरली, तो पर्यंत तिच्या हातावर व कमरेला चाकूचा घाव बसला. हा प्रकार बघताच तिच्या मैत्रणीने धाडसाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वणी : बातमीदार