Home Breaking News शहरातील पथदिवे गुल, तरी सुद्धा पालिका ‘कुल’

शहरातील पथदिवे गुल, तरी सुद्धा पालिका ‘कुल’

CO चे दुर्लक्ष, प्रशासकाचे कुठे आहे लक्ष. !

सुनील पाटील | शहरात मागील काही कालावधी पासून बहुतांश प्रभागातील पथदिवे रात्री बंदावस्थेत असतात. पालिका मुख्याधिकारी व प्रशासक शहरातील मूलभूत सुविधा पुरवणे विसरल्याचे दिसत असले तरी स्थानिकांनी आवाज बुलंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. मूलभूत सुविधेसह पथदिवे गुल, तरी सुद्धा पालिका ‘कुल’ हे भविष्यात घातक ठरणार आहेत.

शहरातील अनेक प्रभागात मागील काही महिन्यांपासून पथदिवे रात्रीच्या सुमारास बंद असतात. त्यातच चोरीच्या घटना सुद्धा वाढलेल्या वणीकर नागरिकांनी अनुभवल्या आहेत. ‘त्या’ चोरीच्या घटनेमुळे ठाणेदाराची उचलबांगडी झाल्याचे सर्वश्रुत आहे. या सर्व घटना घडामोडीला शहरातील बंद असणारे पथदिवे कारणीभूत असल्याचे बोलल्याजात आहे.

आमदार वास्तव्यास असलेल्या परिसरातील पथदिवे बंद असतात तर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रभागातील वास्तव कसे असेल हे न उलगडणारे कोडे आहेत. देशमुखवाडी, कनकवाडी, जिजाऊ नगर, आनंद नगर, रवी नगर, एकता नगर, विठ्ठलवाडी, प्रगती नगर, ढुमे नगर या शिवाय अन्य परिसरातील पथदिवे रात्रीच्याच सुमारास का बंद ठेवण्यात येते, हा संशोधनाचा विषय आहे.

Img 20250103 Wa0009

शहरात भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर अभूतपूर्व कायापालट झाला हे मान्य करावेच लागेल. मात्र प्रशासकीय सत्ता येताच संपूर्ण यंत्रणा कोलमडली का ? तसेच प्रशासक आणि कंत्राटदार यांचे वर्चस्व वाढले हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही.

शहरातील अंतर्गत रस्ते, ठीकठिकाणी खोदलेल्या नाल्या, रस्त्यावर पसरलेले ढिगारे, पालिकेची अनास्था दर्शवत आहे. तरी सुद्धा नागरिक आवाज बुलंद करत नसल्याने प्रशासकाचे चांगभलं आहे. त्यातच लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात सपशेल अपयशी ठरताहेत. पथदिवे निमित्तमात्र ठरत असले तरी नागरिकांत कमालीचा असंतोष निर्माण होत आहे.
वणी : बातमीदार