● पुन्हा नांदेकरांची जिल्हा प्रमुखपदी वर्णी
वणीः प्रत्येक राजकीय पक्षांत एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा मानसन्मान केल्या जातो. तर पक्षांसोबत दगाबाजी करणाऱ्यांना ‘गद्दार’ संबोधल्या जाते. शिवसेनेत आमदारांनी पुकारलेल्या बंडानंतर एकनिष्ठ असलेले शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. अशा शिवसैनिकांची दखल मातोश्री वरुन घेतल्याचे दिसत असुन माजी आमदार विश्वास नांदेकर यांचेवर पुन्हा एकदा पक्षप्रमुखांनी जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे.
यवतमाळ जिल्हयातील काही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चांगलेच प्राबल्य आहे. आज पर्यंत जिल्हयात शिवसेनेचे तीन आमदार निवडून आलेत. यात सर्वप्रथम बाळू उर्फ श्रीकांत मुनगीनवार त्यानंतर संजय राठोड व विश्वास नांदेकर यांनी आमदारकी उपभोगली. माञ अभुतपुर्व बंडानंतर शिवसेनेत बलाढय समजल्या जाणाऱ्या संजय राठोड यांनी शिंदे गटाला जवळ केल्याने जिल्ह्यात शिवसेना कमकूवत होईल असे समजल्या जात होते.
संजय राठोडांचे दारव्हा, दिग्रस मतदार संघ वगळता इतर मतदार संघात फारसे प्राबल्य नाही. तरी सुद्धा त्यांनी जिल्ह्यातील जुने किंवा असंतुष्ट शिवसैनिक शिंदे गटात समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु सध्यस्थितीत शिंदे गटात सामील होत असणाऱ्या शिवसैनिकांमुळे खऱ्या शिवसेनेची फारशी हानी झाल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही.
वणी विधानसभा क्षेञात माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे चांगले प्राबल्य आहे. त्यातच काही भागात प्रबळ जनाधार असणारे पदाधिकारी आहेत. तसेच त्यांनी जुन्या व नव्या शिवसैनिकांची मोट बांधून होऊ घातलेल्या निवडणुका कशा जिंकता येईल याची रणनीती आखली आहे.
शिवसेनेशी फारकत घेवून शिंदे गटात सामील झालेल्या खा. भावना गवळी व मंञी संजय राठोड यांना शह देण्यासाठी व्यूहरचना आखल्या जात आहे. त्या करीता पक्षासोबत एकनिष्ठ असलेले बाळू मुनगिनवार, विश्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड व प्रविण शिंदे यांचेवर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मातोश्री वरुन नुकत्याच फेरनियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यावेळी पक्षासोबत एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांवर पक्षश्रेष्टींनी महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. माजी आमदार नांदेकर यांचेवर पुन्हा एकदा पक्षप्रमुखांनी विश्वास दाखवित जिल्हा प्रमुखांची जबाबदारी दिली आहे.
वणी: बातमीदार





