● उद्धव ठाकरेंनी “त्या” पथकाला खडसावले
Political News | वणी येथे सोमवारी शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभेसाठी आले होते. हेलिपॅड वर त्यांचे आगमन होताच निवडणूक विभागाच्या पथकांनी हेलिकॉप्टर मधील ठाकरे यांच्या बॅगाची तपासणी केली. याप्रसंगी तपासणी पथकाला चांगलेच खडेबोल सुनावण्यात आले असून फडणवीस, शिंदे यांच्या बॅग तापसल्यात का अशी विचारणा करण्यात आली. तर यापुढे मोदी, शहा यांच्या बॅग सुद्धा तपासा व त्याचा व्हिडिओ पाठवा असे ठणकावत, तेव्हा शेपूट घालू नका असे ठाकरे यांनी सुनावले. Also check Modi, Shah’s bags and send video of it.

येथील महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे उमदेवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे हे सोमवारी दुपारी 1 वाजता हेलिकॉप्टरने दाखल झाले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हेलिपॅडवर ते उतरले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करत असताना तेथे अचानक काही पोलीस व निवडणूक विभागाचे तपासणी पथक दाखल झाले.
उद्धव ठाकरे व त्यांच्या समवेत हेलिकॉप्टरने अलेल्यांच्या बॅगा तपासायच्या असल्याचे सांगितले. या प्रकाराने हेलिपॅडवर काही काळ गोंधळ उडाला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराला विरोध केला. स्वत: उद्धव ठाकरे तपासणी पथकाला हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही करत आहात, असा प्रश्न उपस्थित केला.
तसेच बॅगा सर्वांच्याच तपासता का ?, अशी विचारणा करण्यात आली. बॅगाची तपासणी करत असताना ठाकरे म्हणाले की, “काय उघडायचं ते उघडा, मग मी उघडतो तुम्हाला” तसेच फडणवीस, शिंदे, मोदी शहांच्या बॅगा तपासा असे ठणकावले. व्हिडीओ काढणाऱ्याला ठाकरे यांनी विचारले तुझं नाव काय… “माझं नाव उध्दव ठाकरे तुझं.” असा प्रश्न करताच त्याने विजय पटले, असं सांगितलं कुठे राहतोस असं विचारल्यावर त्याने एमपी असं सांगितल्यावर बरं झालं गुजरातचा नाही असं मिश्किल वक्तव्य केलं.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात या या बाबीचा खरपूस समाचार घेतला. बॅग तपासण्याच्या या प्रकाराला लोकशाही मानत नाही, असे ठाकरे म्हणाले. यंत्रणेने निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांच्या बॅगा तपासायला हव्या की नको, असा प्रश्न करीत हा प्रकार सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्याने चालत असल्याचा आरोप केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उदधव ठाकरे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोच्या जनसमुदायाला संबोधतांना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यावर तुफान हल्ला चढवला. शेतकरी हिताबाबत दुर्लक्षित धोरण अवलंबणारे हे सरकार अडाणी, अंबानी ह्या मित्रांना कवेत घेणारे असल्याचे स्पष्ट केले.
उदधव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर लाडक्या बहीनींना प्रतीमहा तीन हजार तर शेतकऱ्यांना 3 लाख रूपया पर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. सोबतच पाच वर्ष मुलभूत वस्तुचे दर कायम राहील असे अभिवचन दिले आहे. यावेळी व्यासपीठावर मिलींद नार्वेकर, खा. प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, किशोर तिवारी, आशिष खुळसंगे, उमेदवार संजय देरकर, वरोरा येथील मविआचे उमेदवार प्रविण काकडे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते.
ROKHTHOK NEWS