● “मॅन ऑफ द सिरीज” ठरले बोदकुरवार
● पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय
Political News :
प्रतिष्ठेची लढत ठरलेल्या वणी नगर परिषद निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत विरोधकांची अक्षरशः दाणादाण उडवली. विद्यमान अमदारापेक्षा भाजपच्या माजी आमदारांनी आपले अस्तित्व सिद्ध केले. नगराध्यक्ष पदासह तब्बल 19 जागांवर भाजपने विजय मिळवत सत्ता आपल्या ताब्यात घेतली, तर शिवसेना (शिंदे) गटाला खातेही उघडता आले नाही. Bodkurwar was named “Man of the Series”
या संपूर्ण निवडणूक “मॅच”मध्ये भाजपचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे स्पष्टपणे “मॅन ऑफ द सिरीज” ठरले. बूथनिहाय नियोजन, उमेदवारांची योग्य मांडणी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद, मतदारापर्यंत पोहचण्याची कवायत आणि सातत्यपूर्ण प्रचार यामुळे बोदकुरवार यांची रणनीती निर्णायक ठरली. तर शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांनी प्रचार यंत्रणा काटेकोरपणे राबवत *“मॅन ऑफ द मॅच”*ची भूमिका आक्रमकपणे बजावली.
भाजपच्या विजयामागे केवळ लाट नव्हे, तर संघटनात्मक शिस्त आणि नियोजनबद्ध प्रचार हे प्रमुख कारण ठरले. प्रत्येक प्रभागात स्थानिक प्रश्न, विकासाचे मुद्दे आणि केंद्र-राज्य सरकारच्या योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. “पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे” असेच निकालातून स्पष्टपणे दिसून आले.
विरोधकांच्या पराभवामागे अनेक कारणे समोर आली आहेत. काँग्रेस पक्षात अंतर्गत समन्वयाचा अभाव आणि तिकीट वाटपातील अनागोंदी याचा थेट फटका बसला. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बलाढ्य असूनही प्रचार यंत्रणेत नियोजनाचा अभाव सकृतदर्शनी जाणवला. यामुळे अपेक्षित वातावरण तयार करता आले नाही. आघाडीला मनसेची साथ मिळाली असली तरी मतदारांवर प्रभाव टाकण्यात आघाडीला अपयश आले.
शिवसेना (शिंदे) गटाला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. संघटनात्मक मर्यादा, प्रचारातील उणिवा आणि स्थानिक पातळीवर ठोस मुद्द्यांचा अभाव आढळून आला. त्यातच नव्यानेच आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली असताना विजय चोरडिया सपशेल अपयशी ठरले. यामुळे शिंदे गटाला मोठा फटका बसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
वणी नगर परिषद निकालाने एक स्पष्ट संदेश दिला आहे. संघटन, नियोजन आणि कार्यकर्त्यांची ताकद असेल तरच सत्ता मिळते. हा विजय भाजपसाठी आत्मविश्वास वाढवणारा असून विरोधकांसाठी आत्मपरीक्षणाची संधी ठरतो आहे. एकूणच, वणी नगर परिषदेत विरोधकांचा “धुव्वा” उडण्यामागे भाजपची रणनीती, नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची मेहनत हे निर्णायक घटक ठरले.
Rokhthok






