● सहा महिन्यांपासून नागरीक त्रस्त
● गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
Wani News :
गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील छोरिया लेआऊटमध्ये खनिज विकास निधी अंतर्गत सुरू असलेले ड्रेनेज पाईपलाईन व सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून संथगतीने सुरू असून निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. Citizens have been suffering for six months due to poor drainage and CC road work.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, जानेवारी 2025 पासून सुरू असलेले हे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. ड्रेनेज पाईपलाईनचे जॉईंट व्यवस्थित न जोडल्याने सांडपाणी गळती होत असून, स्थानिकांच्या घरांच्या कंपाउंड वॉलला ओलावा निर्माण होतो आहे. पाईपलाईनला आवश्यक स्टे कोट न करता तसेच चेंबरवर झाकणही न बसवता काम पूर्ण केल्याने कचरा व प्लास्टिक पाईपमध्ये जात असून पाईपलाईन ब्लॉक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच ठेकेदाराने टी-पॉईंटजवळ ड्रेनेज पाईप फुटल्यावर देखील त्याचे पुनर्बांधकाम योग्य पद्धतीने केले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहन वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अनेकांना वाहन रस्त्यावरच ठेवावी लागत आहेत. परिणामी, एका नागरिकाच्या दुचाकी चोरीचा प्रयत्नही झाला.
सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामातही गंभीर त्रुटी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. क्रॉक्रीटमध्ये रेतीऐवजी फक्त चुरीचा वापर केल्याचा आरोप असून, उन्हाळ्याच्या उच्च तापमानात काँक्रीट टाकून त्यावर पाणी न मारल्याने जागोजागी भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात रस्ता अधिक खराब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या साऱ्या कामाची गुणवत्ता, योजनेप्रमाणे काम होत आहे की नाही याची चौकशी करण्यात यावी, प्लॅन, इस्टीमेट, मोजमाप व बांधकाम साहित्याचे रिपोर्ट नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, योग्य न्यायासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला.
याप्रसंगी शंतनू गोहोकार, मधुकर देवाळकर, संबाशीव पावडे, नरेंद्र ताजने, रमेश बोढाले, राकेश भंडारी, बंडू बनकर, राजू पावडे, भाग्यश्री कुरेकार, अनिल काळे, रवींद्र येरणे यांच्या सह स्थानिकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
Rokhthok News






