● प्रचंड धास्ती, शेतकरी शुद्ध हरपला
● घोंसा शेत शिवारातील घटना
Wani News | तालुक्यात वाघाचा पूर्वी मुक्त संचार होता. नरभक्षी वाघाचा बंदोबस्त केल्यानंतर शेतकरी-शेतमजूर सुखावले होते. मात्र बुधवार दिनांक 4 ऑक्टोबरला घोंसा शेत-शिवारात वाघ प्रकटला आणि शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याचा अनुभव स्थनिकाना आला. A tiger appeared in the Ghonsa fields and the condition of the farmers working in the fields worsened.

रासा येथील बाळू सिडाम यांचे घोन्सा फुलोरा घोन्सा ओपन कास्ट सिएचपी शिवारात शेत आहे. तेथे प्रकाश मारोती आत्राम हा आपल्या परिवारासह शेतीकाम करत होता. अचानक दुपारी त्याला वाघाचे समोरासमोर दर्शन झाले. काय करावं हे त्याला सुचत नव्हतं तर समोरच काही अंतरावर त्याची पत्नी आणि लहान मुले होती.
प्रकाश प्रचंड घाबरला समोर मृत्यू दिसत होता. तो लगतच असलेल्या झाडावर चढला व पत्नी आणि मुलांना मचान वर चढण्यास सांगितले. तो झाडावर व वाघ झाडाच्या खाली, काय करावे हे त्याला सुचत नव्हते. बराच वेळ ते दोघे समोरासमोर असल्याने त्याचे अवसान गळाले आणि तो शुद्ध हरपला.
ही बातमी वाऱ्या सारखी गावात पसरली. स्थानिक तरुण आरडाओरडा करत त्या शेतात पोहचले. त्यांनी वाघाला हुसकावून लावले तरी तो झाडावरून खाली उतरायला तयार नव्हता. घडलेल्या घटनेची त्याने प्रचंड धास्ती घेतली होती. त्याला व त्याच्या परिवाराला स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले.
वाघाच्या दर्शनाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी शेतमजूर भयभीत झाले आहेत. वनविभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Rokhthok News