● पार्किंग सुविधा नसल्याने उडतो गोंधळ
● रहदारीच्या मार्गावर वाहतूक कोंडी
Wani News : शहरात बँका आणि वित्तीय संस्थानी बाजारपेठ व रहदारीच्या मार्गावर पार्किंग व्यवस्था नसताना व्यवसाय थाटला आहे. या अनागोंदी कृती विरोधात युवासेना आक्रमक भूमिका अवलंबणार असून संबंधितांनी पार्किंगची व्यवस्था करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे. Yuva Sena will adopt an aggressive stance and concerned should arrange parking

शहरात सर्वत्र वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. बाजारपेठ व मुख्य रहदारीच्या मार्गावर बँका व वित्तीय संस्थानी आपली दुकानदारी थाटली आहे. ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने रहदारीच्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होतेय. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास अवर्णनीय असताना बँक व्यवस्थापन आणि पालिका प्रशासन “ढिम्म” असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय बँका, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था ग्राहकांना पार्किंगची व्यवस्था करून देण्याकडे लक्ष देतांना दिसत नाही. दुकानदारी थाटण्यापूर्वी पार्किंग व्यवस्था आहे की नाही याची पडताळणी करूनच या संस्थांनी भाडेतत्त्वावर दुकाने घ्यावीत. मात्र तसे न करता सर्व सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा त्यांचा असलेला पवित्रा अजिबात खपवून घेणार नसल्याचे अजिंक्य शेंडे यांनी स्पष्ट केले आहे.
सण उत्सवाचे दिवस आहेत, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असल्याने शहरात मोठी गर्दी उसळते. रस्ते गर्दीने फुलून निघतात, बाजारपेठेतील रस्ते अरुंद आहे, प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. बँका, वित्तीय संस्था आणि प्रतिष्ठानासमोर नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेली वाहने नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
शहरात पार्किंगची व्यवस्था नसलेल्या बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था यांना पालिका प्रशासनाने तातडीने सूचना पत्र देत पार्किंग व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत. बाजारपेठेतील प्रतिष्ठान, वित्तीय संस्था यांचे दुकानासमोर संबंधितांनी पार्किंग व्यवस्था करावी व वाहतुकीस अडथळा होत असेल तर “त्या” प्रतिष्ठानावर वाहतूक शाखेने प्रत्येक वेळी दिसेल तेव्हा कारवाई करावी.
शहरातील रस्त्यावर अनधिकृत पार्किंग होणार नाही याची काळजी पालिका प्रशासन व वाहतूक शाखेने घ्यावी. अन्यथा युवासेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल याला सर्वस्वी पालिका, वित्तीय संस्था व वाहतूक शाखा जबाबदार असेल. निवेदन देताना सुरेश शेंडे, तेजस नागपुरे, आर्या राऊत, बादल येसेकर, रुद्राक्ष सिदाम, चौधरी, चैतन्य लोडे, नीकेश कडुकर, नीरज घागी, बदखल, मशिष मंदे यांची उपस्थिती होती.
Rokhthok News