* मध्यरात्री जुगारावर छापा
* 67 हजाराच्या मुद्देमाल जप्त
* दहा संशायित ताब्यात
मारेगाव: दीपक डोहणे-अवैद्य व्यवसायाला चाप बसविण्यासाठी मारेगाव पोलिसांनी शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील एका घरातील जुगार खेळणाऱ्या टोळीवर छापा टाकून 67 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत दहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई मंगळवारच्या मध्यरात्री करण्यात आल्याने अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 4 मधील एका नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. याच घरात मंगळवारी रात्री तब्बल 10 जण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. कारवाईची व्यूहरचना आखीत मध्यरात्री 1 वाजताचे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी, बीट जमादार आनंद अलचेवार, बंटी मेश्राम, अनिल गिनगुले यांनी छापा टाकून 1 मोटारसायकल, 5 मोबाईल, 52 गंजीपत्ते सह रोख रक्कम असा जवळपास 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत मारेगाव येथील 8 तर मांगरुळ येथील 2 असे 10 संशायितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.