Home वणी परिसर झरी आय.टी. आय. मेळाव्यात 82 उमेदवारांची निवड

झरी आय.टी. आय. मेळाव्यात 82 उमेदवारांची निवड

409
* प्राचार्य तेलतुमडे यांचा पारदर्शक प्रसार व कार्याची फलश्रुती

मारेगाव: दीपक डोहणे- 14 ऑगस्ट ला आयटीआय पास उमेदवारांकरीता आयटीआय झरीजामनी येथे रोजगार व शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात ग्रामीण व शहरी भागातून आलेल्या 82 उमेदवारांची निवड करण्यात आली. संस्थेची पारदर्शक प्रसार यंत्रणा मुळे उदंड प्रतिसाद मिळालेल्या यशस्वी मेळाव्याची फलश्रुती ठरली.

Img 20250422 wa0027

हंसलपूर गुजरात येथुन  सुझुकी मोटर्स आणि बारामती येथुन पियाजियो व्हेईकल्स प्रा. लि. या नामांकित कंपन्यां संस्थेत उपस्थित झाल्या होत्या. सोशल मीडिया वरून व ओळखीचे सर्व संबंधित व्यवसाय निदेशक, प्राचार्य, खाजगी संस्थांचे संस्थापक या सर्व मान्यवर मंडळी यांना प्रत्यक्ष मोबाईल वरुन संवाद, वर्तमान पत्रातील बातमी, जवळील काही संस्थांमध्ये प्रचाराचे फ्लेक्स ईत्यादी प्रचारतंत्राचा वापर करण्यात आला.  दोन्ही कंपनींच्या मान्यवर प्रतिनिधींचा यथोचित सन्मान आणि त्यांनी पाहिलेली परीस्थिती यामुळे आलेल्या सर्व उमेदवारांची आम्ही निवड करु असा मानस त्यांनी बोलुन दाखविला.

Img 20250103 Wa0009

किनवट, हदगाव (औरंगाबाद विभाग), अहेरी, मुलचेरा, चिमुर, जिवती, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती,वरोरा (नागपूर विभाग), झरीजामनी, अमरावती, यवतमाळ (अमरावती विभाग) असे तीन विभागातील उमेदवार उपस्थित होते. अगदी लातुर, पुणे, सांगली, नागपुर, गोंदिया येथील उमेदवारांचे फोन आलेले, पण एवढ्या लांब आम्ही पोचणार कसे हा त्यांचा सहज प्रश्न होता. दुरुन येणाऱ्या मुलांसाठी संस्थेत मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती.

झरीजामनी छोटेसे गाव, आदिवासी बहुल असल्याने मुलांना त्रास होवु नये म्हणून गावातील कॅन्टीन वाले राजु तलांडे व  मारोती उईके यांनी संस्थेत चहा नास्ताची व्यवस्था करुन घेतली. नरेंद्र येते, सहाय्यक संचालक, प्रादेशिक कार्यालय अमरावती, महेशकुमार सिडाम, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यवतमाळ व प्रमोद भंडारे, स. प्र. सल्लागार यवतमाळ यांचे अमुल्य मार्गदर्शन यावेळी सर्वांना लाभले. सर्व उपस्थित मान्यवर आणि कंपनीचे प्रतिनीधी यांना यावेळी शाल देऊन गौरवण्यात आले.

दिगंबर दळवी-संचालक, डीव्हीइटी म.रा.मुंबई, यांनी व्हिडिओ काॅन्फरंसिंग व्दारे सर्व उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या हा या कार्यक्रमाचा दुग्धशर्करा योग होता. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण केले तसेच टूलकिट  वितरण केले.

सुझुकी कंपनीने 39 उमेदवारांची निवड तर पियाजियो कंपनीने 43 उमेदवारांची निवड केली. याप्रमाणे एकूण 82 उमेदवारांची निवड करण्यात आली. काही उमेदवारांना निवडपत्र जाहिरपणे देण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निवड झाल्याने आयटीआय झरीजामनी परीसरात सर्वांचे चेह-यावर फलश्रुती चा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. मेळाव्यात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत चहाबिस्कीट ची व्यवस्था करण्यात आली.

मेळावा यशस्वी करण्याकरिता सर्व उपस्थित मान्यवर, कंपनीचे प्रतिनीधी, संस्थेचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी  परीश्रम घेतले. प्राचार्य संजय रामभाऊ तेलतुमडे यांनी आभार मानले.