Home वणी परिसर ‘प्रतीक्षा’ रसायनशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

‘प्रतीक्षा’ रसायनशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

Img 20250910 wa0005

लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे सुयश

वणी: वणी सारख्या सुदूर तथा आदिवासीबहुल भागात शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यात अग्रेसर असणाऱ्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा अंबागडे ही रसायनशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाली. रसायनशास्त्र विभागाद्वारे आयोजित नेट सेट मार्गदर्शन केंद्राला पहिल्याच वर्षी अत्यंत कौतुकास्पद यश प्राप्त झाले आहे.

Img 20250103 Wa0009

महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा अंबागडे या केंद्रातील मार्गदर्शनाच्या आधारे पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या रसायनशास्त्रात तासिका तत्त्वावर काम करणारे अध्यापक अमित काळे यांनी देखील या परीक्षेत यश संपादन केले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्या मार्गदर्शनात रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनंदा अस्वले यांच्या पुढाकाराने सुरू असणाऱ्या या केंद्रात अध्यापन करणारे प्रा. ज्ञानेश्वर खामनकर प्रा. कुनाल वनकर आणि स्वतः डॉ. सुनंदा अस्वले हे तीनही मार्गदर्शक स्वत: सेट उत्तीर्ण आहेत हे विशेष उल्लेखनीय.

प्राध्यापक पदावरील नियुक्ती साठी अनिवार्य असणार्‍या या अत्यंत खडतर परीक्षेत महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्गाने मिळवलेले हे यश महाविद्यालयासाठी निश्चितच मोठ्या गौरवाचा विषय आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा या उज्ज्वल यशाप्रीत्यर्थ प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तथा संयोजिका डॉ. सुनंदा अस्वले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
वणी: बातमीदार