वणी- जीवनात मनुष्य हा आपल्याकडे असलेल्या पैशाने श्रीमंत होत नाही तर आई वडिलांनी दिलेली शिकवण सर्वात मोठी श्रीमंती असून मनुष्य आपल्या आचार विचाराने मोठा होत असल्याचे प्रतिपादन वणीतील नवं नियुक्त ठाणेदार शाम सोनटक्के यांनी केले. शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

वणीतील ठाणेदार पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी दि. 4 सप्टेंबर ला शाम सोनटक्के यांनी प्रभार घेतला. येणारे सण उत्सव शांततेत पार पडावे या करिता येथील महसूल भवनात शांतता कमिटीचे सदस्य, गावातील गणमान्य नागरिक व पत्रकार यांची बैठक आयोजित केली होती.
आयोजित बैठकीत गजानन कासावर व नीलिमा काळे यांनी वणी शहराचा परिचय करून देतांना काही समस्या मांडल्या. यावर ठाणेदार सोनटक्के यांनी समस्याचे निराकरण करण्याची ग्वाही देऊन येणारे सण उत्सव शासनाने दिलेल्या नियमानुसार साजरे करावेत. तसेच पोलीस आणि जनतेने मिळून काम केल्यास त्या कामाचे सार्थक होईल. आज विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. “मी काम केल्या नंतरच माझे स्वागत करावे” अशी अपेक्षा व्यक्त करून जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार सोनटक्के यांनी केले.
यावेळी राकेश खुराणा, रवी बेलूरकर, निकेत गुप्ता, मंगल तेलंग, रज्जाक पठाण, मिलिंद पाटील, अजय धोबे, प्रदीप बोनगीनवर, राजाभाऊ बिलोरिया, मंदा बांगरे, शालिनी रासेकर, विजया आगबत्तलवर यांचेसह दक्षता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शेखर वांढरे यांनी केले.