Home Breaking News शाम सोनटक्के यांना वणी ठाणेदार पदाचा ‘प्रभार’

शाम सोनटक्के यांना वणी ठाणेदार पदाचा ‘प्रभार’

488

* पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांची रवानगी

वणी:  वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांची प्रशासकीय बदली 30 ऑगस्ट ला झाली होती. परंतू त्यांच्या रिक्त जागी 5 दिवस लोटूनही दुसऱ्या अधिकाऱ्याला प्रभार दिला नव्हता. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सण उत्सव लक्षात घेता पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांना वणीचा तात्पुरता प्रभार दिल्याने तर्क-वितर्काना विराम मिळाला आहे.

वणी ठाणेदार पदावर कोणाची वर्णी लागणार या बाबत विविध चर्चा झडत होत्या. आपापल्या सोयीची नावे पुढे करण्यात येत होती. परंतू जिल्ह्याचा कारभार पारदर्शकपणे संभाळण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतलेला निर्णय स्तुत्यच असणार आहे. आता नव्यानेच रुजू होणारे ठाणेदार शाम सोनटक्के हे आपल्या कार्यपद्धतीचा परिचय अवघ्या काही दिवसातच वणीकरांना देतील, ते यापूर्वी यवतमाळ वाहतूक शाखेत होते.

जिल्ह्यात वणी पोलीस ठाण्याला ‘हेविवेट’ ठाणे म्हणून ओळखल्या जाते. येथे काहीकाळ वर्णी लागावी या करिता अनेक अधिकारी फिल्डिंग लावतात. एकवेळा गव्हरमेन्ट डिझायर घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाऱ्याने वणी ठाण्याचा प्रभार घेतला होता. कोणता अधिकारी शेवटच्या क्षणापर्यंत बाजी मारेल हे कोडे अद्याप उलगडले नाही.

पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांची प्रशासकीय बदली नागपूर येथे झाली आहे. त्यांनी सर्वाधिक 30 महिन्याचा कार्यकाळ भूषवला आहे. कोरोना कालखंडातील दीड वर्ष त्यांनी योग्यरीत्या हाताळले आहेत. अवैध व्यवसायावर आळा बसवला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतांनाच सामाजिक एकोपा राखण्यात त्यांना यश आले आहे. नव्या ठाणेदारापुढे अनेक आव्हाने असतील ती ते कसे पेलतील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.