Home वणी परिसर चिंचमंडळ वासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा

चिंचमंडळ वासीयांना गढूळ पाण्याचा पुरवठा

538

नागरिकांचे आरोग्य प्रभावित
ग्रा.पं. मध्ये भोंगळ कारभाराचा परिपाक

मारेगाव बातमीदार: दीपक डोहणे
तालुक्यातील चिंचमंडळ येथील नागरिकांच्या वाट्याला रंगीत पण गढूळ पिण्याचे पाणी नशिबी आले असून येथील जनतेचे आरोग्य पुरते प्रभावित झाले आहे. प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असतांना नागरिकांत प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला जातो आहे.

चिंचमंडळ गाव विविध शासकीय योजने पासून कोसो दूर असतांना नागरिकांची मूलभूत गरज असलेली पाणी पुरवठा योजना अडगळीत आहे. विविध समस्यांचे निराकरणासाठी ग्रा.पं. सदस्यांनी माहिती मागितली मात्र तत्कालीन ग्रामसचिवांनी माहिती देण्यास ठेंगा दाखविला आहे. येथील सजग नागरिकांनी ग्रा.पं. च्या कारभाराची माहिती मागितली मात्र भोंगळ कारभार असल्याने पारदर्शक माहिती सचिवांनी दिली नसल्याने सदस्यांनी लांबलचक तक्रारी केल्यात. या तक्रारीची गंभीर दखल घेत सचिवाची उचलबांगडी करण्यात आली हे येथे विशेष .यामुळेच ग्रामपंचायत च्या बेताल कारभाराचा परिपाक समोर येत याची झळ नागरिकांना पोहचत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था ही ग्राम पातळीवरील विकास कामाची संस्था म्हणून अधोरेखित करण्याचा गवगवा येथे पोकळ ठरते आहे. दोन हजारा पेक्षा जास्त असलेल्या लोकसंख्येला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येतो. एकूण चार हातपंप असलेले काही हात पंप अखेरची घटका मोजत आहे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे मात्र कायम दुर्लक्ष होत आहे. पर्यायाने तोडक्या पाणी पुरवठ्याने गढूळ पाण्याचा पुरवठा व तो ग्रहण करण्याचे वास्तव चिंचमंडळ वासीयांच्या नशिबी ऐन पावसाळ्यात आले आहे. ब्लिचिंग पावडरचा वापरही होत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन व सत्ताधारी नेमके काय करते आहे ? असा प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तूर्तास गढूळ पाणी पुरवठ्याने येथील नागरिकांचे आरोग्य प्रभावित झाले आहे. प्रशासन मात्र मूग गिळून आहे.यापुढे मासिक महिन्याचा अहवाल पुढील मासिक सभेत ग्रा.पं. सदस्यांना पत्र स्वरूपात देण्यात यावा यामुळेच भोंगळ कारभारावर टाच बसेल अशी मागणी येथील सदस्या भाग्यश्री सातपुते यांनी केली आहे.