Home क्राईम कलंकित…..भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण

कलंकित…..भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण

422

* जादूटोणा- भानामतीचा संशय

* निर्ढावलेले ग्रामस्थ आणि भेदरलेला परिवार

* चंद्रपूर जिल्ह्यातील अमानुष प्रकार

वणी बातमीदार: चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वणी (खुर्द) गावात माणुसकीला काळिमा फासणारी कलंकित घटना शनिवारी घडली. जादूटोणा- भानामतीच्या संशयावरून एकाच परिवारातील महिला व पुरुषांना हातपाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या संतापजनक घटनेतील आरोपींची धरपकड सुरू असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस प्रशासन कमालीची गुप्तता बाळगत आहे.

जिवती तालुक्यातील वणी (खुर्द) या गावात दोन दिवसांपासून निरव शांतता आहे. घडलेली घटना समाजमन कलुषित करणारी आहे. अंधश्रद्धेचे भूत अद्याप माणगुटीवरून उतरले नाही. घटनेच्या दिवशी गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी आली आणि त्यांनी दलित समाजातील वयाने ज्येष्ठ आठ-दहा लोकांची नावे घेऊन त्यांनी भानामती केल्याचे सांगितले. त्याला बळी पडून गावातील काही लोकांनी त्या सर्वांना भरचौकात खांबाना बांधून बेदम मारहाण केली. वृद्ध, महिलांना सुद्धा मारहाण करण्यात आली.

या मारहाणीत शांताबाई भगवान कांबळे (53), साहेबराव एकनाथ हुके (48), धम्मशिला सुधाकर हूके (38), पंचफुला शिवराज हुके (55), प्रयागबाई एकनाथ हुके हे जबर जखमी झालेत. तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. हा प्रकार सुरू असताना गावातील इतर लोक मूकदर्शक बनले होते. भीतीने कुणीही मध्ये पडले नाही, याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केले असले तरी घटनेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येत आहे. गावाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला जात आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धेची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहे हे स्पष्ट होत असले तरी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे.