● मिलिंद तेलतुंबडे वर लालगुडा येथे अंत्यसंस्कार
● पोलीस प्रशासन अलर्ट
तो उच्च शिक्षित होता, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून जनसेवेसाठी जात असल्याचे घरच्यांना सांगून निघून गेला. शनिवारी माओवादी व पोलिसात झालेल्या चकमकीत तो मारल्या गेल्याने अखेर पंचेविस वर्षांनी त्याचा मृतदेहच परतला. जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे यांचेवर सोमवारी सायंकाळी 5:45 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला.
वणी तालुक्यातील राजूर (इजारा) ह्या गावातील मिलिंद तेलतुंबडे हे तल्लख बुद्धिमत्तेचे होते. अतीशय कठीण परिस्थितीतून त्याने उच्च शिक्षण घेतले. वेकोलीत नोकरी करत असताना त्यांनी आयटक युनियन च्या जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी पार पाडली. या दरम्यानच तो नक्षल चळवळीत ओढल्या गेला.
महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर शनिवारी माओवादी व पोलिसात झालेल्या चकमकीत नक्षल चळवळीचे कमांडर मिलिंद तेलतुंबडे हे ठार झाल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी त्यांच्या परिवाराला कळवली. त्यांचा मृतदेह आणण्यासाठी जवळचे नातेवाईक सोमवारी सकाळी गडचिरोली ला रवाना झाले होते.
गडचिरोली पोलिसांनी संपूर्ण कागदोपत्री पूर्तता करून दुपारी 2 वाजता मिलिंद तेलतुंबडे यांचा मृतदेह नातेवाईकांना सोपवत पोलीस बंदोबस्तात पाठवला. 4 वाजताच्या दरम्यान लालगुडा येथील पुतण्या ऍड. विप्लव तेलतुंबडे यांचे घरी आणण्यात आला.
सायंकाळी 5: 45 वाजता लालगुडा येथील स्मशानभूमीत त्यांची आई, पत्नी अंजला, भाऊ, पुतणे तसेच नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी संपूर्ण प्रक्रियेवर पोलीस करडी नजर ठेवून होते.
वणी: बातमीदार