Home Breaking News बाजार समिती शेतकरी हिताची की व्यापाऱ्यांच्या..!

बाजार समिती शेतकरी हिताची की व्यापाऱ्यांच्या..!

380

आठ दिवसाचा अल्टीमेटम.. अन्यथा

वणी: कृषी उत्पन्न बाजार समितीतील परवानाधारक व्यापारी धिरज अमरचंद सुराणा याने सोयाबीनची खरेदी करून 147 शेतकऱ्यांना एक कोटी 15 लाखाचा ‘गंडा’ घातला. बेधुंद वागणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समिती चा अंकुश नसल्याचे उजागर झाले आहे. बाजार समिती शेतकरी हिताची की व्यापाऱ्यांच्या..! असा प्रश्न उपस्थित करत ती रक्कम आठ दिवसात द्यावी असा अल्टीमेटम संचालक तेजराज बोढे यांनी संचालक मंडळ व बाजार समिती प्रशासनाला दिला आहे.

शेतकऱ्यांची एकूण रक्कम जो पर्यंत अदा होत नाही तो पर्यंत बाजार समिती यार्डातून व्यापाऱ्याने माल हलवलाच कसा ? असा प्रश्न बोढे यांनी उपस्थित केला आहे. बाजार समितीत सातत्याने व्यापारी हित जोपासल्या जाते. शेतकऱ्याचा माल उघड्यावर तर व्यापाऱ्यांच्या मालाला संरक्षण का दिल्या जाते हा संशोधनाचा विषय आहे.

धिरज अमरचंद सुराणा या व्यापाऱ्याने 147 शेतकऱ्यांचे जवळपास 1 हजार 935 क्विंटल सोयाबीन खरेदी केले होते. त्याची एकूण रक्कम एक कोटी 15 लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. बाजार समितीच्या नियमानुसार 24 तासात रक्कम अदा करणे अभिप्रेत होते मात्र एक महिन्याचा कालावधी उलटल्यामुळे शेतकऱ्यांना ‘गंडा’ तर घातला नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बाजार समितीच्या प्रांगणात व्यापाऱ्याने चालवलेली ‘दडपशाही’ बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळ कसे खपवून घेतात हे कोडे आहे. अशा व्यापाऱ्यांना परवाना देतांना बाजार समितीने काटेकोर पडताळणी करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांची थकीत रक्कम अदा करण्याची सर्वस्वी जबाबदारी बाजार समितीची आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीने कठोर कारवाई करावी. व्यापाऱ्याने थकवलेले 147 शेतकऱ्यांच्या सोयाबीन चे चुकारे बाजार समिती ने तात्काळ अदा करावे. आठ दिवसांत शेतकऱ्यांची रक्कम न दिल्यास ‘त्या’ पीडित शेतकऱ्यांसह बाजार समिती यार्डातच उपोषण करण्यात येईल असा अल्टीमेटम संचालक तेजराज बोढे, महेश दशरथ देठे, जीवन गजानन झाडे, यांनी निवेदनातून दिला आहे.
वणी: बातमीदार