Home Breaking News धक्कादायक… चक्क कोळशावरच टाकला ‘दरोडा’

धक्कादायक… चक्क कोळशावरच टाकला ‘दरोडा’

2832

सुरक्षा रक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न
MSF जवानांची सतर्कता
13 आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद 7 अटकेत

वणी: आर्थिक बाबतीत संलग्न असणाऱ्या प्रतिष्ठानावर दरोडा पडत असल्याच्या घटना आपण ऐकल्यात. मात्र कोळसा खदाणीतून दोन हायवा मधून कोळशावरच दरोडा घातल्याची खळबळजनक घटना गुरुवार दि.10 फेब्रुवारी ला पहाटे घडली. कोळसा तस्करांनी सुरक्षा रक्षकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर वणी व शिरपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 13 आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून सात आरोपींना ताब्यात घेत 26 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या उकणी कोळसा खदाणीतून हायवा क्रमांक MH-49 AT-9192 व MH-40 AK-5291 या दोन ट्रक मधून जुने पिंपळगाव खादण ते भालर या मार्गाने चोरीचा कोळसा आणत असल्याची माहिती MSF जवानांना मिळाली होती. MSF जवान भालर लगत झुडुपात दबा धरून बसले होते.

चोरीचा कोळसा भरलेले ट्रक दिसताच MSF जवान व वेकोलीचे सुरक्षा रक्षकांनी वाहने अडवली असता त्यांच्या अंगावर वाहन चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी ठाणेदार शाम सोनटक्के यांना माहिती मिळताच पथकासह त्यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी शिरपूर चे ठाणेदार गजानन करेवाड हे सुध्दा पोलीस कर्मचाऱ्यांसह पोहचले. या घटनेतील सात आरोपींना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता तब्बल 13 तस्करांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

कोळसा दरोडा प्रकरणी अशफाक, नागेश रामन्ना चित्तलवार रा. महादेव नगर चिखलगाव, रोहण वारारकर, अरविंद विजय भोयर रा. मोहदा, धिरज रामकृष्ण मडकाम डोर्ली, हर्षल रमेश लोहबळे रंगनाथनगर, स्वप्नील पांडुरंग नागपुरे रा. रामपुरा वार्ड, जितेंद्र सिंग उर्फ कालु संजन सिंग भालर, धनराज मंगल येसेकर रा. गणेशपुर व राजु केसेकर रा. राजुर कॉलरी असे दहा तर तीन अज्ञात अशा 13 तस्करांवर भादवि कलम 307, 395, 353 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या घटनेतील दोन्ही हायवा ट्रक मध्ये तब्बल 40 टन 970 किलो कोळसा किंमत 2 लाख 25 हजार 335 रुपयांचा कोळसा तर 24 लाख रुपयांचे दोन ट्रक असा एकूण 26 लाख 25 हजार 335रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वेकोलीचे सिक्युरीटी गार्ड इंचार्ज शिवराम डवरे (52) WCL उकनी खदान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, SDPO संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात पो.नि. सोनटक्के, सपोनि माया चाटसे, पोउपनि प्रथिन हिरे, संतोष आढाव, विशाल गेडाम, शंकर चौधरी, निरंजन खिरटकर, सुभम सोनुने, विजय राठोड, चालक सुरेश किन्नाके यांनी पार पाडली.
वणी: बातमीदार