Home वणी परिसर विद्वेषाची नव्हे, विवेकाची भाषा बोला…!

विद्वेषाची नव्हे, विवेकाची भाषा बोला…!

414

छत्रपती महोत्सवात अविनाश दुधे यांचे प्रतिपादन

वणी: मराठा सेवा संघाच्या वतीने 19 ते 24 फेब्रुवारी दरम्यान छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी “मीडिया वॉच पब्लिकेशन”चे संपादक अविनाश दुधे यांनी “सामान्य माणसांचा राजा : शिवाजी राजा” या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विद्वेषाची नव्हे, विवेकाची भाषा बोला, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच मार्गक्रमण केल्यास यशप्राप्ती होईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर होते. उद्घाटक म्हणून श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणीचे अध्यक्ष संजय खाडे यांच्या हस्ते छत्रपती महोत्सवाचे रीतसर उदघाट्न करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी मान्यवरांना “कुणबी-मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री” हा ग्रंथभेट देऊन स्वागत केले.

SDO डॉ. शरद जावळे, SDPO संजय पुजलवार, ठाणेदार श्याम सोनटक्के, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष भारती राजपूत, शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष शहाबुद्दीन अजानी, अस्थिरोगतज्ञ डॉ. प्रतिक कावडे, गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटी वणीचे व्यवस्थापक विजय मोडक, फिजिओथेरपिस्ट अरुंधती उपरे, युवा उद्योजक बालाजी म्हसे हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर लिखित आत्मचरित्र “शून्यांचा ताळमेळ” व नवोदित साहित्यिक शिक्षिका आशाकला कोवे यांच्या “पाझर” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. तसेच, वणी शहरातील ऋषभ बबन धानोरकर, मोहित सरोजअशोक केला, घनश्याम संगीता लक्ष्मण काकडे या तरुणानी ठाणे जिल्ह्यातील माहुली गडाशेजारी स्थित अतिशय दुर्गम असलेला वजीर सुळका अथक प्रयत्नांनी सर केला. म्हणून या गिर्यारोहकांचा मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.

सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवामध्ये संपन्न झालेल्या चित्रकला, निबंध आणि प्रकटवाचन या स्पर्धांमधील विजेत्यांना गौरवचिन्ह देऊन बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली जेनेकर व रोहिणी मोहितकर यांनी, तर प्रास्ताविक संजय गोडे, आभार प्रदर्शन नितीन मोवाडे यांनी केले. या महोत्सवास वणीकर शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
वणी: बातमीदार