● परिवहन विभागाची अनास्था चव्हाट्यावर
वणी: आदिवासीबहुल झरीजामणी तालुक्यातील तरुणांना वाहन चालवण्याचा परवाना व अन्य कामासाठी यवतमाळला RTO कार्यालयात यावे लागते. स्थानिक तरुणांना दिलासा द्यावा ही मागणी घेऊन अहेरअल्लीचे सरपंच हितेश उर्फ छोटू राऊत यांनी थेट RTO च्या खुर्च्या RDC यांना भेट देण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सरपंचानी केलेल्या अनोख्या आंदोलनाने अधिकारी ‘चक्रावले’.
स्थानिक तरुणांना दिलासा मिळावा म्हणून परिवहन विभाग साधा कॅम्प लावत नसल्याने संबंधित विभागाची अनास्था चव्हाट्यावर येत आहे. 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या झरीजामणी येथील विद्यार्थी आणि तरुणांना वाहन चालविण्याचा परवाना आणि परिवहन विभागाशी निगडीत अन्य कामांसाठी यवतमाळला यावे लागते. परिवहन विभागाने झरीजामणी येथे कॅम्प लावावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे.
अहेरअल्लीचे सरपंच हितेश उर्फ छोटू राऊत यांनी प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे आणि सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक भोपाळे यांच्याकडे केली होती. मात्र, निर्ढावलेल्या परिवहन विभागाने योग्य ती दखल घेतली नाही. सातत्याने करण्यात येत असलेल्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी राऊत RTO कार्यालयात सोमवार दि.30 मे ला दुपारी गेले असता अधिकारी मुख्यालयी नव्हते.
छोटू राऊत यांनी RTO कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता प्रत्येकाने उडवाउडवीची उत्तरे दिली यामुळे ते संतप्त झाले. त्यांनी लगेचच प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या खुर्च्यांना हार घातला व त्या खुर्च्या वाहनात टाकून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि त्या खुर्च्या RDC यांना भेट देण्याचा प्रयत्न केला.
● RDC ललितकुमार वऱ्हाडे यांची ग्वाही ●
हितेश राऊत यांनी केलेल्या आंदोलनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी माहिती जाणून घेतली. तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्च्या भेट म्हणून स्वीकारण्याचे कुठलेही प्रावधान कायद्यात नसल्याचे स्पष्ट केले. तसेच याप्रकरणी तातडीने निर्णय घेणार असल्याची ग्वाही दिली.
वणी: बातमीदार