● ओल्या दुष्काळाच्या सावटात आत्महत्येचे पीक
वणी: मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव) येथे वास्तव्यास असलेल्या 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याने रविवारी विषाचा घोट रिचवला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ओल्या दुष्काळाच्या सावटात आत्महत्येचे पीक आलेले असताना शासन मात्र मेळावा आणि संभाव्य निवडणुकांची रणनीती आखताहेत.
मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे तांडव सुरू आहे. एक दिवसाआड तरुण शेतकरी आपले जीवन संपवताहेत. ओल्या दुष्काळाच्या सावटात वावरणारा बळीराजा आर्थिक विवंचनेत अडकल्यानेच आत्मघाती पाऊल उचलत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
सुधीर रवी गोलर (28) असे विषाचा घोट रिचवणाऱ्या तरुण शेतकऱ्यांचे नाव आहे. रविवार दि. 4 सप्टेंबर ला सायंकाळी त्याने वडगाव शिवारातील शेतात विष प्राशन केले. ही बाब लगतच्या शेतातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर ला हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान सुधीरची प्रकृती खालावत चालली होती. मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई व एक भाऊ आहे. मारेगाव तालुक्यात सातत्याने होणाऱ्या आत्महत्या, चिंतेचा विषय असून शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
वणी: बातमीदार